जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जुलै २०२३ । हवामान खात्याने पुढील ४ ते ५ दिवसांसाठी हवामानाचा इशारा जारी केला आहे. त्यानुसार राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. यात जळगाव जिल्ह्याला आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मागील दोन दिवसात जिल्ह्यातील विविध भागात पावसाच्या सरी कोसळल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी
मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात मुळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यापार्श्वभूमीवर यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नंदूरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे
या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
हवामान खात्याने पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. आज गुरूवारी पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात दिवसभर आकाश पूर्णतः ढगाळ तर बहुतेक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. या काळात घाटमाथ्यावर जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यताही हवामान खात्याने वर्तविला आहे.
कोकणाला रेड अलर्ट जारी
हवामान खात्याने कोकणाला रेड अलर्ट जारी केला आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश भागात आज अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, असं आवाहन देखील हवामान खात्याने केलं आहे.
पेरणीला वेग
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून सायंकाळी पावसाने हजेरी लावली. बुधवारी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. जून महिना संपून जुलै उजाडला तरी अद्यापही जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस आला आहे. मात्र गेल्या दोन दिवसात झालेल्या मध्यम पावसाने शेतकरी पेरणी करू लागल्याचे दिसून येतेय. आज हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार जळगाव जिल्ह्यात जोरदार पाऊस होईल, असं सांगितलं आहे