जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२३ । राज्यातील गेल्या वर्षी झालेल्या सत्तांतरापासून ठाकरे गटात सुरू असलेली गळती थांबण्याचे नाव घेत आहे. अशातच भुसावळ ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मात्र या शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात नाही तर भाजपात प्रवेश केला आहे. आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीपूर्वी लागलेली ही गळती ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
यांनी केला भाजपात प्रवेश?
भुसावळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका संघटक प्रा. धीरज पाटील, माजी पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे, तालुका प्रसिद्धीप्रमुख गोकुळ बाविस्कर, दिव्यांग सेनेचे माजी तालुकाप्रमुख फिरोज तडवी, युवा सेनेचे तालुका समन्वयक सुरेंद्र सोनवणे, बूथ प्रमुख प्रशांत बागले, ललित नेहेते, कैलास पाटील, विकास सपकाळे, प्रा. सीमा पाटील, सरला सपकाळे, पल्लवी पाटील तसेच अयोध्या नगर येथील जेष्ठ नागरिक भगवान ठाकरे, लक्ष्मीकांत इंगळे, रघुनाथ पाटील, धनसिंग बोरणारे, गोवर्धन सावकारे, सुधाकर कोळी, मनोहर वराडे, दशरथ माळी, मधुकर बेंडाळे, नरेंद्र नेमाडे यांनी भुसावळ मतदार संघाचे आमदार संजय भाऊ सावकारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत गुरु पौर्णिमेच्या दिवशी भाजपामध्ये प्रवेश केला.
यावेळी आमदार संजय सावकारे, समाजसेवक प्रमोद सावकारे, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, माजी नगरसेविका अनिता सपकाळे, समाजसेवक सतीश सपकाळे, समाजसेवक अजय नागराणी, बापू महाजन, भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी, उपाध्यक्ष अमोल पाटील उपस्थित होते.
शिवसेनेचे अभ्यासू नेतृत्व भाजपात
गेल्या नऊ वर्षांमध्ये भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासाला चालना दिली. भुसावळ तालुक्यात विकास पर्व घेऊन आमदार संजय भाऊ सावकारे यांनी निरंतर कार्य सुरू ठेवले आहे म्हणून त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज भाजपामध्ये प्रवेश करीत आहोत. भविष्यात पक्ष विस्तार व संघटन वाढीवर भर देणार आहे, असे प्रा. पाटील यांनी सांगितले.
नवीन पिढीचा भाजपवर विश्वास दृढ झाला आहे. राजकारणपेक्षा विकासावर अधिक भर दिला जातोय म्हणूनच अनेक जेष्ठांसह तरुणांनी आज भाजपामध्ये प्रवेश घेतला आहे. यापुढेही पक्षात अनेक कार्यकर्ते जुळणार असल्याचे आमदार संजय सावकारे यांनी सांगितले.