जळगाव लाईव्ह न्यूज । १ जुलै २०२३ । तुम्हीही राज्य सरकारी कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रापाठोपाठ राज्य सरकारने देखील आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे. त्यामुळे, सरकारी नोकरदारांना आणखी पगार वाढून मिळणार आहे.
राज्य सरकारने यासंदर्भात शासन निर्णय जारी केला असून राज्य सरकारी कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना शासनाच्या या निर्णयाचा लाभ होणार आहे.
केंद्र सरकारने ३ एप्रिल २०२३ रोजी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 4 टक्के वाढ केली. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता ३८ टक्क्यांवरुन महागाई भत्ता ४२ टक्क्यांवर पोहोचला आहे. ही महाभाई भत्त्यातील वाढ आता महाराष्ट्र सरकारनेही लागू केली आहे.
राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ केली आहे. दरम्यान, राज्य सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सध्या ३८ टक्के महागाई भत्ता मिळतो. त्यात ४ टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याने महागाई भत्ता ४२ टक्के इतका झाला आहे. विशेष बाब म्हणजे, १ जानेवारी २०२३ पासून ही वाढ लागू करण्यात आली असून, पाच महिन्यांच्या थकबाकीसह जूनच्या वेतनापासून देण्यात येणार आहे.
त्याचबरोबर शासकीय कर्मचाऱ्यांना गेल्या पाच महिन्यांची थकबाकीही रोखीने देण्यात येणार आहे. वित्त विभागाने त्यासंबंधीचा शासन आदेश शुक्रवारी प्रसृत केला. राज्यातील १७ लाख शासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे