अमळनेरच्या ९ वर्षीय तनयचा गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड
जळगाव लाईव्ह न्यूज | 21 जून 2023 | संपुर्ण जिल्ह्याला आभीमान वाटेल असे काही जगावेगळे अमळनेरच्या तनय रितेश चौधरी या ९ वर्षीय मुलाने केले आहे. तनय चौधरी गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा मानकरी ठरला आहे.
तनय हा अमळनेरचा मुळ रहीवासी. बदलापूर येथे एका आयटी कंपनीत तनयचे वडील रितेश गोविंदा चौधरी हे काम करतात. नोकरी निमित्ताने त्याचे आई वडील हे मुंबईतील बदलापूरमध्ये स्थायिक झाले आहेत.तनय याने स्केटिंग हा खेळ खेळावा अशी कुटुंबाची इच्छा होती. त्यानुसार कुटुंबाने तनय याला स्केटिंगचा क्लास लावला.
शिवगंगा रोलर स्केटिंग क्लब तर्फे ३० मे रोजी बेळगावमध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत तनयने सहभाग घेतला . स्केटिंग रिले स्पर्धेत ३७० स्पर्धकांचे १२ ग्रुप बनवण्यात आले होते. सलग ४८ तासांची स्केटिंग रिले स्पर्धा आयोजित केली होती. त्यात एका संघाने फास्टेस्ट १०० मीटर इनलाईन स्केटिंग ११.२१ सेकंदात पूर्ण केली आणी जागतिक विक्रम बनवला. तनय याला मनीषा गावकर, अथर्व गावकर यांचे मार्गदर्शन लाभले.
तनय हा अमळनेर येथील गोविंद चौधरी आणि आशालता चौधरी या सेवानिवृत्त शिक्षक दाम्पत्याचा नातू आहे. शिक्षक संघटनेचे मधुकर चौधरी, नगरसेवक विवेक पाटील, दीपक चव्हाण, अशोक मोरे, कैलास बोरसे, अनिल धनुरे आदींनी तनयचे कौतुक केलं आहे.