जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जून २०२३ । येत्या लोकसभा निवडणुकित खासदार रक्षा खडसे यांचे तिकिट कापले जाते की काय अश्या चर्चा सध्या रंगु लागल्या आहेत. यातच मंत्री गिरीश महाजन यांनी एक महत्वाचे वक्तव्य केले आहे. यावेळी महाजन म्हणाले की, रक्षा खडसे या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. मात्र, आगामी निवडणुकीत त्यांना पुन्हा तिकीट मिळेल की नाही, याबाबत ठामपणे सांगता येणार नाही.
पुढे बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की , रावेर लोकसभा मतदारसंघ हा सुरुवातीपासून भाजपचाच मतदार संघ राहिलेला आहे. रक्षा खडसे यांनी केलेल्या दावा योग्यच आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेक योजना मतदारसंघांमध्ये राबवल्या, चांगले काम केले आहे.
उमेदवारी बाबत भाजपचे हायकमांड हे निर्णय घेत असत. गेल्या काही वर्षांमध्ये आपण अनुभव बघितले तर भाजपचे माजी खासदार स्वर्गीय हरिभाऊ जावळे असतील, आमदार स्मिता वाघ असतील, तसेच खासदार उमेश पाटील यांचे उदाहरण असेल ऐनवेळी कशा पद्धतीने या उमेदवारांची तिकिटे कट करण्यात आली. त्यामुळे हा भाजपचा हायकमांडचा निर्णय आहे. ऐनवेळी काहीही होऊ शकते, असेही मंत्री गिरीश महाजन म्हणाले.