जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जून २०२३ । मुक्त विद्यापीठाची परीक्षा सुरू असताना परीक्षार्थींना त्रास न देण्यासाठी लाचेपोटी पाच हजार रुपये मागून अमळनेरच्या प्रताप महाविद्यालयातच लाच स्वीकारणार्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या बहिस्थ परीक्षकाला नाशिक एसीबीने अमळनेर येथून अटक केली आहे. विजय गुलाबराव पाटील (50, रा. सिद्धिविनायक कॉलनी, घर नंबर 171, अमळनेर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास हा सापळा यशस्वी झाल्याने शिक्षण क्षेत्रातील लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

अमळनेरातील 40 वर्षीय तक्रारदार यांच्या पत्नी प्रियंका या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अंतर्गत बिलीप (बॅचलर ऑफ लायब्ररी) ची अंतिम परीक्षा देत आहेत. या परीक्षेचे पेपर्स हे अमळनेर शहरातील प्रताप महाविद्यालयात सुरू आहेत. तक्रारदार यांची पत्नी प्रियंका व त्यांच्या सोबतच्या एकूण आठ विद्यार्थ्यांना बहिस्थ परीक्षक विजय पाटील हे पेपर्स घेऊन विनाकारण त्रास देत होते शिवाय त्रास न देता सहकार्य करण्यासाठी तक्रारदाराच्या पत्नीकडे शंभर रुपयांप्रमाणे नऊ विषयांचे नऊशे तसेच एकूण आठ विद्यार्थ्यांचे सात हजार दोनशे रुपये लाच मागण्यात आली. अमळनेरच्या तक्रारदाराने नाशिक एसीबीकडे शुक्रवारी तक्रार नोंदवताच सापळा रचण्यात आला. दुपारी 12 वाजता तक्रारदाराकडून लाच स्वीकारताच आरोपी विजय पाटील यास अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मनेतृत्वात राजेंद्र गीते, संदीप बत्तीसे, संजय ठाकरे, संतोष गांगुर्डे आदींच्या पथकाने यशस्वी केला.







