जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जून २०२३ । राज्यासह जळगाव जिल्ह्यातील तापमानात चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तापमानाचा पारा घसरून ४१ ते ४२ अंशावर आला होता. मात्र गेल्या तीन चार दिवसापूर्वी पारा पुन्हा वाढून जिल्ह्यातील तापमान ४३ अंश सेल्सिअसवर गेल्याने जळगावकर उष्णतेने हैराण झाले आहेत. उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आज जळगाव जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सध्या असह्य उकाडा होत असून आगामी आठवडाभरही तापमानाचा पारा ४० अंशावर राहणार आहे. असं असले तरी आगामी दोन दिवस जिल्ह्यातील ठराविक भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
त्याच अनुषंगाने हवामान खात्याकडून आज शनिवारी जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुपारपर्यंत उष्ण तापमान राहणार असून सायंकाळीनंतर वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यात दोन ते तीन तालुक्यांमध्ये ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहून गडगडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीस खबरदारी घेण्याची गरज असल्याचं हवामान खात्याने म्हटले आहे.