
जळगाव लाइव्ह न्यूज । २७ मे २०२३ । शहरात सुरु असलेल्या अमृत योजनेचे एकुण १६ झोन आहेत. यापैकी बहुतांश झोन मधील काम ९५ टक्के पेक्षा जास्त झालेले आहे. परंतु थोड्या थोड्या कामांमुळे या भागातील अमृतचा पाणी पुरवठा सुरु होणे बाकी आहे, या विषयी शुक्रवारी आ. सुरेश भोळे यांनी महापालिकेत आढावा बैठक घेवून अमृतचे एक एक झोन पुर्ण करून तेथील पाणी पुरवठा सुरु करा, अशा सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
या वेळी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, भाजपा गटनेते राजेंद्र घुगे पाटील, नगरसेवक विशाल त्रिपाठी, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, उपायक्त गणेश चाटे तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. आमदार सुरेश भोळे यांनी अधिकाऱ्यांचा आढावा घेतांना पावसाळ्यापुर्वी रस्त्यांची डागडूजी व नालेसफाई करण्याच्या आदेश अधिकाऱ्यांना दिले. तसेच महानगरपालिकेच्या शाळांमधील मुलांची संख्या वाढविण्यासाठी व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे, अश्या सुचना देखील त्यांनी केल्या. त्याचप्रमाणे शहरातील नवीन भागांमध्ये अद्यापही पथदिवे नाहीत, अशा भागात विजेचे पोल उभे करून पथदिवे बसविण्यात यावेत, असेही त्यानी सांगितले.

चौकट* जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी ३० कोटींची मागणी
मेहरूण तलावात जाणाऱ्या सांडपाण्याला आळा घालून त्या पाण्यावर प्रक्रिया करण्याकरीता प्रकल्प उभारणीसाठी शासनाकडून ३० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी केली. मेहरूण तलावाच्या आजूबाजूला निवासस्थाने झालेली आहेत, त्याचे सांडपाणी तलावात जात आहे, त्यामुळे तलावातील पाणी खराब होत असून त्यातील पक्षी तसेच प्राणी यांनाही धोका आहे. त्यामुळे या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्पाची आवश्यकता आहे, म्हणून आ. भोळे यांनी शासनाकडे पाठपुरावा करून ३० कोटी रूपयांचा निधी आणावा अशी मागणी करण्यात आली. त्यावेळी आमदार भोळे यांनी शासनदरबारी आपण हा प्रश्न उपस्थित करून लवकरच निधी मंजूर करून आणणार असल्याचे सांगितले. तसेच महापालिकेच्या आकृती बंधाला मंजुरी मिळाली मात्र, भरतीचे नियम शासनाने दिलेले नाहीत, तसेच काही त्रुटींमुळे मनपात भरती करता येत नसल्यामुळे आ. भोळे यांनी शासनाकडे पाठपुरावा करावा व भरतीचा मार्ग मोकळा करून द्यावा, अशी मागणी देखील महापौर, उपमहापौरांनी त्यांच्याकडे केली आहे.







