जळगाव लाईव्ह न्यूज । केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०२२ ला घेण्यात आलेल्या ९३३ जागांसाठीच्या परीक्षांचे अंतिम निकाल आज जाहीर झाले असून यात दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबलच्या विविध वर्गांमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या ९ विद्यार्थ्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशाची पताका फडकावली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये अंजली शर्मा, बिहार (AIR 450 ), रिचा कुलकर्णी, हैदराबाद ( AIR 54), अक्षय साबद्रा, जळगाव (AIR 327), शुभाली परमार, लातूर ( AIR 473) सागर खर्डे, अहमदनगर (AIR 445), रोशन कछवा, चाळीसगाव (AIR 620), सागर धेटे, जळगाव (AIR 691 ), स्वप्नील डोंगरे, नाशिक (AIR 707), अंकित पाटील, जळगाव ( AIR 762) यांचा समावेश आहे.
दीपस्तंभ मनोबलमध्ये दिव्यांगांसाठी दिल्या जाणाऱ्या विशेष प्रशिक्षणाचा खूप फायदा झाला. यजुर्वेंद्र महाजन सर आणि इतर सर्व अधिकाऱ्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे आत्मविश्वास वाढला. भविष्यात मी सुद्धा मनोबल करीत असलेल्या कामात माझे योगदान देईल अश्या भावना या प्रसंगी अंजली शर्माने व्यक्त केल्या.
समाजातील सर्वच स्तरातील घटकांमधून कर्तव्यदक्ष, सवेंदनशील आणि प्रामाणिक अधिकारी घडावे यासाठी संस्था १७ वर्षांपासून कार्यरत आहे. याही वर्षी विदयार्थ्यांना उत्तम यश मिळाले आहे, त्याचा आनंद वाटतो. प्रज्ञाचक्षू असणाऱ्या अंजली शर्माने मिळवलेले यश हे दिव्यांग व वंचित घटकातील विदयार्थ्यांसाठी विशेष प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण कष्ट आणि संस्थेतील अनेक जेष्ठ प्रशासकीय अधिकारी, मार्गदर्शक व देणगीदार यांच्या मुळे हे यश प्राप्त झाले आहे अश्या भावना दीपस्तंभ फाऊंडेशनचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन यांनी यावेळी व्यक्त केल्या.
या विद्यार्थ्यांना श्री.राजेश पाटील( आय.ए.एस ),श्री.वैभव निंबाळकर ( आय.पी.एस), श्री.उज्वल चव्हाण (आय.आर.एस), श्री.अभिजीत राऊत (आय.ए.एस), श्री.मयूर सूर्यवंशी (आय.ए.एस), पुजा कदम (आय.ए.एस), यजूर्वेंद्र महाजन , सोबत अकरा अधिकाऱ्यांची टिम यांनी मार्गदर्शन केले असे विभाग प्रमुख मिलिंद उषा रामकृष्ण यांनी कळवले आहे.