जळगाव लाईव्ह न्यूज । २१ मे २०२३ । मुंबईच्या कुर्ला भागातील एम.एम.ज्वेलर्समध्ये काम करणार्या कारागीराने सराफा व्यावसायीकाकडून मिळणार्या वागणुकीला व वेळेवर पगार न देण्याच्या सवयीला कंटाळून 28 लाख रुपये किंमतीचे 498 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे चोरले व ट्रेनने पश्चिम बंगालकडे प्रवास सुरू केला.(kurla gold crime )

संशयित भुसावळमार्गे हावडाकडे निघाल्याची शक्यता गृहित धरून कुर्ला पोलिसांनी भुसावळ लोहमार्ग व रेल्वे सुरक्षा बलाला सूचित केल्यानंतर आरोपीच्या रविवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास मुसक्या आवळण्यात यंत्रणेला यश आले. सुदाम निमाई सामंता (31, बांदीपूर, हुगळी, पश्चिम बंगाल) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. दरम्यान, आरोपीचा रविवारी दुपारी तीन वाजता कुर्ला पोलिसांनी ताबा घेतला.

मनोज मोहनलाल जैन (50, कुर्ला, मुंबई) यांचा मुंबईतील कुर्ला भागातील 241/ए, देवी भवन, गोल बिल्डींग, पहिला माळा येथे सोन्याचे दागिणे बनवण्याचा कारखाना आहे. शनिवारी दुपारी दिड वाजता जैन हे जेवायला गेल्यानंतर कारागीराने संधी साधत रेल्वेने धूम ठोकली. दुपारी अडीच वाजता जैन हे कारखान्यात आल्यानंतर जैन यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी धाव घेत कुर्ला पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.
कुर्ला आरपीएफ निरीक्षक पी.आर.मीणा व कुर्ला पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक गणेश काळे यांनी भुसावळ स्टेशनचे निरीक्षक आर.के. मीणा यांना शनिवारी रात्री पावणेदहा वाजता याबाबत माहिती दिल्यानंतर संशयितांचा फोटोदेखील प्राप्त झाल्याने भुसावळ विभागीय सुरक्षा आयुक्त एच.श्रीनिवास राव, सहायक सुरक्षा आयुक्त बी.पी.कुशवाहायांच्या मार्गदर्शनाखाली सीपीडीएस पथक तयार करण्यात आले.
उपनिरीक्षक के.आर.तरड, हवालदार श्रीकृष्ण कोळी, हवालदार विनोदकुमार गुर्जर आणि हवालदार इम्रान खान, हवालदार महेंद्र सिंह कुशवाह, हवालदार सागर पकडले आणि कॉन्स्टेबल दीपक शिरसाठ यांनी डोळ्यात तेल घालून शनिवारी रात्रीपासूनच हावडाकडे जाणार्या गाड्यांची तपासणी सुरू करीत भुसावळ रेल्वे स्थानकाच्या विविध भागात संशयिताचा शोध सुरू केला. रविवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास खंडवा बाजूने दिशेने हवालदार श्रीकृष्ण कोळी यांना संशयित आरोपी दिसताच बॅगेसह येत असल्याचे दिसताच त्यास ताब्यात घेवून रेल्वे सुरक्षा बलाच्या ठाण्यात आणण्यात आले. यावेळी संशयिताच्या बॅगेतून 28 लाख रुपये किंमतीच्या 32 सोन्याच्या साखळ्या जप्त करण्यात आल्या.







