एसीबीची मोठी कारवाई : 30 लाखांची लाच घैताना वकील जाळ्यात
जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मे २०२३ । एसीबीच्या गळाला सर्वात मोठा मासा लागला असून या कारवाईने संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. कारण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये संचालकपदी निवडून आल्यानंतरही त्यांच्या निवडीविरोधात दाखल झालेल्या प्रकरणात सुनावणी घेऊन तक्रारदार यांच्या बाजूने निर्णय देण्यासाठी 30 लाख रुपयांच्या लाच घेताना जिल्हा उपनिबंधक सतीश भाऊराव खरे (57, फ्लॅट नंबर 201, आई हाईट्स, कॉलेज रोड, नाशिक) व खाजगी हस्तक तथा वकील शैलेश सुमातीलाल साबद्रा (32, फ्लॅट नं 4, उर्वी अपार्टमेंट सौभाग्य नगर, गंगापूर रोड, नाशिक) यांना नाशिक एसीबीने राहत्या घरातून अटक केल्याने लाचखोर हादरले आहेत.
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत निवडीविरुद्ध प्रतिस्पर्धी उमेदवाराने हरकत घेतली होती. त्यावर खरे याच्याकडे सुनावणी सुरू होती. तक्रारदारांच्या बाजूने निकाल देण्यासाठी खरे याने अॅड.शैलेश साबद्रा यांच्यामार्फत 30 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली मात्र लाचेत साबद्रा यांना टक्केवारी द्यावी लागणार असल्याने खरे याने थेट तक्रारदाराकडेच लाचेची मागणी केली आणि त्यांना आपल्या घरी बोलावून घेतले. यानंतर 30 लाखांच्या लाचेची रक्कम स्वीकारताना पथकाने खरे यास रंगेहाथ अटक केल्याने खळबळ उडाली आहे.
नाशिक परीक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे व पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वातील सहायक उपनिरीक्षक सुकदेव मुरकुटे, पोलीस नाईक मनोज पाटील, अजय गरुड यांच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.