⁠ 
मंगळवार, जानेवारी 7, 2025
Home | जळगाव जिल्हा | शेतकऱ्यांनो! खरीप हंगामासाठी रासायनिक खताची चिंता नको.. 43 लाख टन खत उपलब्ध होणार

शेतकऱ्यांनो! खरीप हंगामासाठी रासायनिक खताची चिंता नको.. 43 लाख टन खत उपलब्ध होणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२३ । येत्या खरीप हंगाम 2023 साठी राज्यात ५ लाख ३३ हजार मे.टन युरीया, २ लाख १५ हजार मे.टन डिएपी, २९ हजार मे.टन पोटॅश, ८ लाख ३९ हजार मे.टन संयुक्त खते आणि ५ लाख १५ हजार मे.टन सुपर फॉस्फेट असे एकुण २१ लाख ३१ हजार मे.टन खतांचा साठा उपलब्ध आहे. हा साठा राज्याच्या खरीप हंगामातील गरजेच्या जवळपास ५० टक्के असून खरीप हंगामात राज्याला ४३ लाख १३ हजार मे.टन आणखी खत उपलब्ध होणार असल्याची माहिती राज्याचे कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

राज्यामध्ये खरीपासाठी भरपूर खत उपलब्ध असले तरी शेतकऱ्यांनी आपल्या पिकाला माती तपासणी अहवालाप्रमाणे खताची मात्रा दिली पाहिजे. प्रमाणापेक्षा अधिक खत दिले तर आपला खर्च तर वाढतोच परंतु सुक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता पिकांना भासून उत्पादन घटते तर आवश्यक ते खत न मिळाल्यासही उत्पादन आणि गुणवत्ता घसरते. रासायनिक खतांसोबत कुजलेले शेणखत, कंपोस्ट, जैविक खत (बायोफर्टिलायझर्स), नॅनो युरिया यांचाही वापर आवश्यकते प्रमाणे करणे आवश्यक आहे.

कृषी विभागाने कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या मदतीने ‘कृषिक ॲप’तयार करुन घेतले आहे. या ॲपच्या मदतीने शेतकऱ्यांना आपल्या जिल्हयासाठी, माती तपासणी अहवालानुसार प्रत्येक पिकासाठी वेगवेगळया खतांची मात्रा आणि त्यासाठी लागणारी किंमत समजण्यास मदत होणार असून याच ॲप मधून आपल्या तालुक्यातील प्रत्येक कृषी सेवा केंद्रात कोण कोणती खते उपलब्ध आहेत याची माहितीही मिळणार आहे. यामुळे खत खरेदी करणे सोपे होणार आहे.

यासाठी सर्व शेतकऱ्यांनी ‘कृषिक ॲप’चा वापर शेतक-यांनी करणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने पीएम प्रणाम ही योजना सुरु केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी खतांचा वापर मृदा तपासणी प्रमाणे केल्यामुळे एकुण खतांच्या अनुदानाच्या रकमेमध्ये बचत होणार असल्याने हे अनुदान केंद्र सरकारकडून राज्याच्या कृषी योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी माती तपासणी अहवालाप्रमाणे खतांचा समतोल वापर करावा, असे आवाहन राज्याचे कृषी आयुक्त श्री चव्हाण यांनी केले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.