जळगाव लाईव्ह न्यूज | २५ एप्रिल २०२३ | जिल्ह्यात दरवर्षी कापसाची लागवड मोठ्या प्रमाणावर होत असते.याच अनुषंगाने जर यंदा पाऊस चांगला पडला तर यंदाही गतवर्षीप्रमाणे मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड होऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.
अधिक माहिती अशी कि, पाऊस वेळेत पडल्यास यंदाही गतवर्षांप्रमाणे जिल्ह्यात २ लाख ७० हजार हेक्टरवर कापसाची लागवड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यासाठी कृषी आयुक्तालयाकडे २५ लाख ५० हजार एवढ्या कापूस बियाण्यांच्या पाकिटाची मागणी नोंदविण्यात आली आहे. मात्र यंदा ‘अल निनो’मुळे पावसात घट झाल्यास त्यांचा परिणामी जिल्ह्यातील कपाशी उत्पादनावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
२३ मार्च रोजी शासनाकडून काढण्यात आलेल्या अधिसूचनेव्दारे बीटी बियाण्याच्या किंमती ठरविण्यात आल्या आहेत. बीटी संकरीत कापूस बीजी १-६३५ रू. तर बीजी २ – ८५३ रुपये किंमतीला कृषी केंद्रचालकांना विक्री करता येणार आहे. मात्र जास्तीच्या दराने बियाण्याची विक्री करणाऱ्या कृषी केंद्रचालकांवर कारवाई करण्याचे संकेत कृषी विभागाकडून देण्यात आले आहेत.