जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२३ । MPSC परीक्षेसाठी विद्यार्थी अहोरात्र मेहनत घेत आहेत. मात्र याचदरम्यान एक धक्कादायक बाब उघडकीस आली असून सर्वांचेच धाबे दणाणले आहे. ती म्हणजे 30 एप्रिल रोजी होणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षेचे हॉल तिकीटची टेलिग्राम लिंक सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले आहे. या लिंकमध्ये सुमारे 90 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट उपलब्ध असल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे.
या संदर्भात सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहितीही एमपीएससीकडून देण्यात आली आहे. ही लिंक कशी व कोणी जनरेट केली? याबाबतचा शोध एमपीएससीकडून सुरु आहे.
दरम्यान, व्हायरल होत असलेल्या लिंकमध्ये मोठा दावा केला जात आहे. हा फक्त नमुना डेटा आहे, आमच्याकडे सर्व एमपीएससी विद्यार्थ्यांची खालील माहिती देखील आहे. ऑनलाईन पोर्टल लॉगिन, फी फावती, अपलोड केलेली कागदपत्रे, आधार कार्ड क्रमांक, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल आयडी आणि बरेच काही. पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिका 2023 देखील उपलब्ध आहे असा दावा देखील या व्हायरल लिंकवर करण्यात आला आहे. एकाच लिंकवर ९० हजारांवर विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट उपलब्ध असल्यानं डेटा सेक्युरिटीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
MPSC खुलासा…
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 30 एप्रिलला रोजी नियोजित विषयांकित परीक्षेची प्रवेश प्रमाणपत्रे 21 एप्रिल 2023 रोजी आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या वेबसाईटवर तसंच तात्पुरत्या बाह्यलिंकद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली होती. यापैकी बाह्यलिंकद्वारे उपलब्ध करुन देण्यात आलेली प्रवेशप्रमाणपत्रे एका टेलिग्राम चॅनलवर प्रसिद्ध होत असल्याची बाब धक्कादायक निदर्शनास आली आहे. यावर एमपीएससीने खुलासा केला आहे.
वेळापत्रकानुसारच परीक्षेचं आयोजन…
ही बाब निदर्शनास आल्यानंतर बाह्यलिंकद्वारे प्रवेशप्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्याची सुविधा बंद करण्यात आली आहे. या चॅनेलवर प्रसिद्ध झालेली प्रवेशप्रमाणपत्रे वगळता उमेदवारांचा कोणताही अन्य डेटा लीक झालेला नाही. याची तज्ज्ञांकडून खात्री करण्यात आली आहे. आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीद्वारे डाऊनलोड करुन घेतलेल्या प्रवेशप्रमाणत्राच्या आधारेच उमेदवारांना परीक्षेस प्रवेश देण्यात येईल. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसारच विषयांकित परीक्षेचं आयोजन करण्यात येईल असंही एमपीएससीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.