⁠ 
मंगळवार, एप्रिल 30, 2024

जळगाव बाजार समितीमध्ये गुलाबभाऊ मोठे तर गिरीशभाऊ ठरणार लहान भाऊ !

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ एप्रिल २०२३ । जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी भाजप व शिवसेना शिंदे गटाच्या जागांचा फॉर्म्युला ठरला असल्याचे चित्र आहे. शिवसेना शिंदे गटाला ११, तर भाजपच्या वाट्याला ७ जागा आल्या आहेत असे म्हटले जात आहे. यामुळे या निवडणुकीत मंत्री गिरीश महाजन हे लहान तर पालकमंत्री गुलाबराव पाटील हे मोठे भाऊ ठरले आहेत.मात्र अजून या पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत.

२० एप्रिलपर्यंत माघारीची मुदत असून, माघारीआधी म्हणजेच बुधवारी भाजप शिवसेना व गटाकडून आपल्या शिंदे अधिकृत उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करेल असे म्हटले जात आहे.

दोन्ही पक्षांकडून इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे आणि युती झाल्यामुळे अनेकांना पक्षाच्या पॅनेलमध्ये उमेदवारी मिळणे कठीण आहे. यामुळे बंडखोरी किंवा काही उमेदवार माविआकडे जाण्याची भीती असल्याने भाजप व शिवसेना शिंदे गटाने उमेदवारांची नावे जाहीर करणे टाळले असल्याच्या चर्चा आहेत.

भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या जागांची वाटणी झाली असून, महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पॅनेलदेखील जवळपास तयार झाले आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप- शिवसेना युतीमध्ये आमने-सामने लढत होणार आहे . ही निवडणूक जरी मविआ विरुध्द युती अशी असली तरी, या लढतीकडे विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील विरुध्द माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर असेच पाहिले जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीची बाजार समितीची निवडणूक ही रंगीत तालीमच मानली जात आहे.