सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जिद्द, चिकाटी, प्रामाणीकतेच्या बळावरच भाजप सत्तेच्या शिखरावर
जळगाव लाईव्ह न्यूज : ७ एप्रिल २०२३ : आज देशातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाला जनमान्यता आहे , फक्त दोन खासदारांपासून भाजपची वाटचाल सुरू होऊन सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जिद्द, चिकाटी, प्रामाणीकतेच्या बळावरच भाजप सत्तेच शिखरावर विराजमान झाला आहे. संसदेत भाजपचे एकट्या भाजपचेच तीनशेच्यावर खासदार आहेत. सत्ता नसतानाही कार्यकर्त्यांनी धीर सोडला नाही. पक्षासाठी खस्ता खाल्ल्या आणि पक्ष संघटनेच्या मागे खंबीरपणे उभे राहिले म्हणूनच भारतीय जनता पक्ष आज सत्तेच्या शिखरावर गेलेला आपण पहात आहोत, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास तथा क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी केले.
भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त शहरासह तालुकाभरामधे भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मी पण-सावरकर बाईक रॅली, मार्गदर्शन शिबिराच्या समारोपप्रसंगी मंत्री महाजन कार्यकर्त्यांना संबोधित करीत होते.
या वेळी नगराध्यक्षा साधना महाजन, तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, जितू पाटील, शहराध्यक्ष आतिष झाल्टे, ज्येष्ठ नेते जगन्नाथ चव्हाण, डॉ. प्रशांत भोंडे, नवलसिंग राजपूत, प्रा. शरद पाटील, अशोक भोईटे, मांगीलाल गिल, गोविंद अग्रवाल, वासुदेव घोंगडे, दीपक तायडे, संजय देशमुख, अमित देशमुख, नामदेव मंगरुळे आदी सहभागी झाले होते.