⁠ 
शनिवार, मे 18, 2024

निवृत्तीनंतर मिळालेल्या पैशांमधून महिलेने उभारले आश्रमासह अन्नछत्र; जळगावच्या महिलेची मध्य प्रदेशात सेवा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज : १ एप्रिल २०२३ : सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर निवृत्ती फंड मिळतो. आपल्या उर्वरित आयुष्यासाठी या फंडची गुंतवणूक केली जाते. मात्र निवृत्ती नंतर मिळालेल्या पैशांमधून नर्मदा परिक्रमा करणार्‍या भाविकांच्या सेवेसाठी आश्रम बांधून तेथे अन्नछत्र चालविण्याचे अविश्‍वसनिय कार्य जळगावच्या एक सेवानिवृत्त प्राचार्य करत आहेत. विशेष म्हणजे, अन्नछत्रासाठी लागणारा खर्चही त्या आपल्या पेन्शनमधून करत आहेत. प्रा.विद्या मुजुमदार त्यांचे नाव आहे.

जळगावच्या विद्या मुजुमदार २०१७ मध्ये भुसावळ येथील श्री संत गाडगे महाराज कॉलेजच्या प्राचार्य म्हणून निवृत्त झाल्या. निवृत्तीनंतर मिळालेल्या पैशांमधून मध्य प्रदेशातील नर्मदा किनारी आश्रम उभारण्यासह ‘श्रीपाद श्रीवल्लभ अनघा दत्त अन्नछत्र’ उभारण्याचा निर्णय त्यांनी घेतला. नर्मदा परिक्रमा करणार्‍यांची सेवा करण्यासह प्रभू दत्तात्रेयांचा पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ (पीठापूर) यांचे स्थान नर्मदा परिक्रमेत असावे हा उद्देश त्यामागे आहे. यासाठी त्यांनी कुटुंबियांच्या मदतीने ओंकारेश्वरच्या जवळ मोरटक्का येथे स्टेशनसमोर ४२०० स्के.फू. जागा खरेदी करून आश्रम बांधला.

या आश्रमात श्रीपाद श्रीवल्लभ अनघा दत्त अन्नछत्र उघडण्यात आले असून, नर्मदा परिक्रमा करणार्‍यांना महाप्रसाद व निवासाची मोफत सोय केली जाते. पोटभर वरण-भात, भाजी, पोळी व एक गोड पदार्थ अन्नछत्रात दिला जातो. याचा खर्च विद्या मुजुमदार यांचे पेन्शन आणि पती अ‍ॅड. मधुसूदन मुजुमदार यांच्या वकिली व्यवसायातून होतो. मुलगा वेदांत हाही वकील असून तिघांनी नर्मदा परिक्रमा केली आहे.