दुर्देवी : जळगाव शहरात भारतीय जवानाचा अकस्मात मृत्यू
जळगाव लाईव्ह न्यूज : १९ मार्च २०२२ : जळगाव शहरातील कांचन नगर परिसरामध्ये बऱ्याच दिवसानंतर सुट्टीवर घरी आलेल्या जवानाचा मृत्यू झाल्या असल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. विशाल भरत सैंदाणे (वय 35) असे मृत जवानाचे नाव आहे.
विशाल हे सैन्य दलामध्ये नाव्ही म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मृत्यू बाबत शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कांचन नगरातील चौगुले प्लॉट येथे रहिवासी असलेले विशाल सैंदाणे हे भारतीय सैन्य दलात नोकरीला होते. ते उत्तर प्रदेश राज्यात कर्तव्य बजावत होते.
विशाल यांच्या मृत्युने त्यांना असलेल्या दोन चिमुकल्यांचे पितृछत्र हरपले आहे. मृत जवान विशाल यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी लहान मुलगा आणि लहान मुलगी याचबरोबर बहिण असा परिवार आहे. देशसेवा करणाऱ्या जवानाचा असा अपघाती मृत्यू झाल्याने जळगाव शहर सुन्न झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून ते सुट्टीवर आले होते. बुधवारी रात्री नऊ वाजता घरच्या जीन्यावरून खाली उतरत असताना विशाल यांचा चक्कर आली. चक्कर आल्याने त्यांचा तोल गेला. ते जिन्यावरून खाली कोसळले. यात ते गंभीर जखमी झाले होते. शेजारी राहणाऱ्या तरुणाच्या मदतीने त्यांना खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. त्यानंतर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यांना दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
अनेक दिवसानंतर विशाल हे सुट्टीवर आल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. मात्र अचानक त्यांच्यावर काळाने झडप घातल्याने कुटुंबासाठी हा खूप मोठा धक्का आहे. घरातले एकुलते एक असतानाही देश सेवेसाठी कुटुंबीयांनी विशाल यांना सैन्यद्रात पाठवले होते.