जळगाव लाईव्ह न्यूज | १३ मार्च २०२३ | नऊवारी साडी आणि नथ घालून अस्सल मराठमोठ्या ढंगात उपस्थितांशी संवाद साधत उद्योजकतेचे धडे देणार्या एका महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या महिला म्हणजे, प्रसिध्द उद्योजिका जयंती कठाळे! ‘पूर्णब्रह्म’ रेस्टॉरंटच्या माध्यमातून त्यांनी पुरणपोळी, उकडीचे मोदक, थालीपीठ, वरण-भात यांसारखे तब्बल १८२ मेन्यू देशभरात नव्हे तर परदेशातही उपलब्ध करुन दिले आहे. एका माहितीनुसार त्यांनी आतापर्यंत तब्बल साडेतीन लाखांवर पुरणपोळ्यांची विक्री केली आहे.
कॉर्पोरेट आयटी कंपनीमध्ये मोठ्या पदावर काम करत असतांना त्यांना परदेशातील दौर्यावर असताना चायनीज, इटालियन असे पदार्थ खाताना अस्सल मराठमोळ्या मातीतील पदार्थ त्याहीपेक्षा अधिक चवीचे जाणवले व ते जगभर पोचले पाहिजेत, असे त्यांना वाटायला लागले. त्यानंतर एका टप्प्यावर त्यांनी कॉर्पोरेट नोकरी सोडून बंगळूरमध्ये ‘पूर्णब्रह्म’ रेस्टॉरंटची स्थापना केली. त्याची व्याप्ती आता जगभर पोचली आहे. त्या नुकत्याच जळगावला आल्या होत्या. जी.एच.रायसोनी अभियांत्रिकी व बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्ताने त्यांचे प्रेरणादायी व्याख्यान झाले.
त्या म्हणाल्या की, पूर्णब्रह्ममध्ये महाराष्ट्रीयन पुरणपोळी, थालीपीठ, वरण-भात यांसारखे तब्बल १८२ मेन्यू आम्ही सध्या दररोज देतो. प्रत्येक थाळीला प्रत्येक वाराशी जोडले असून ‘शिरवाळे’सारख्या हजारो वर्षांपूर्वीच्या रेसिपीचा अभ्यास करून तीही उपलब्ध केली आहे. अमराठी भागात शाखा विस्तार करताना भाषेपासूनच्या अनेक अडचणी असतात; पण त्याचे योग्य नियोजन केले की सर्व गोष्टी आपोआप जमत जातात. मणिपूर, नेपाळची मुलंही कामाला आहेत. त्यांना अथर्वशीर्ष, शुभंकरोति शिकवली असल्याचे सांगून मराठी असल्याचा अभिमान असायलाच हवा आणि तो बाणा जगभर दिमाखात मिरवला जायला हवा, असेही त्या म्हणाल्या. तसेच गर्भवती व बाळंतिणींसाठी विशेष सुविधा, लहान मुलांसाठी तब्बल ४८ मेन्यू, थाळी पूर्ण फस्त करणार्यांना पाच टक्के सवलत असे कितीतरी नवनवीन प्रयोग केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमावेळी व्यासपीठावर रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या संचालिका सौ. राजुल रायसोनी, अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन, सॉफ्ट स्कील ट्रेनर तसेच प्रसिध्द साइकोलॉजिस्ट रम्या राजकुमार, जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सोनल तिवारी व जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका तेजल ओझा उपस्थित होत्या.
जयंती कठाळे यांची प्रेरणादायी वक्तव्ये
- पिझ्झा-बर्गरला मोठी ब्रँड व्हॅल्यू पण पुरणपोळी, मोदकला का नाही?
- प्रत्येक महिला ही दामिनी आहे. तिने उद्योग, व्यवसायात यायलाच हवे.
- जे करायचे आहे त्याचे प्लॅनिंग करा. त्यासाठीची सपोर्ट सिस्टीम तयार करा आणि झपाटून कामाला लागा.
- पतीकडून हिर्याचे पेंडंट घेण्यापेक्षा ते आपण स्वतः विकत घेऊ, अशी जिद्द बाळगा.
- सासू असो किंवा आई; दोघींबरोबर आपली भूमिका स्पष्टपणे मांडा.
- पती आणि पत्नीतील नातं अधिक पारदर्शक ठेवा. एकमेकांना बळ देतच आहे त्या क्षेत्रात यशाला गवसणी घाला.