भाववाढीच्या अफवेने जळगावात दिवसभरात पेट्रोल पंप रिकामा
जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२१ । लॉकडाऊनच्या संकटामुळे सामान्य लोकांना आर्थिक चणचण जाणवत असतानाच आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. पेट्रोल, डिझेलचे दर वाढणार आणि पुढील काही दिवस पेट्रोल डिझेल मिळणार नाही अशी अफवा पसरल्याने जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील एक पंप नागरिकांनी दिवसभरात रिकामा केला.
राज्यातील अनेक शहरांमध्ये बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा काही पैशांची वाढ नोंदवण्यात आली. आज मुंबईत प्रतिलीटर पेट्रोलचा दर 98.36 तर डिझेलचा दर प्रतिलीटर 89.75 इतका आहे.
पेट्रोल आणि डिझेलचा हा वरच्या दिशेचा प्रवास आणखी काही काळ सुरु राहू शकतो. परिणामी अगोदरच लॉकडाऊनमुळे कंबरडे मोडलेले व्यापारी, वाहतूकदार आणि सामान्य नागरिकांना महागाईची झळ सोसावी लागणार आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल- डिझेलचा आजचा दर काय?
मुंबई: पेट्रोल- 98.36 , डिझेल 89.75
पुणे: पेट्रोल- 98.06, डिझेल 88.08
नवी मुंबई- 98.56, डिझेल 89.94
नाशिक: पेट्रोल- 98.76, डिझेल 88.76
औरंगाबाद: पेट्रोल- 99.60, डिझेल 90.99
जळगावात अफवेमुळे एका दिवसात पेट्रोल पंप रिकामा
जळगावच्या मुक्ताईनगर परिसरात मंगळवारी एका अफवेमुळे लोकांनी पेट्रोल पंपांवर प्रचंड गर्दी केली होती. पुढील दहा दिवस पेट्रोल-डिझेल मिळणार नाही, अशी अफवा या भागात पसरली होती. त्यामुळे कुऱ्हाड येथील दोन्ही पेट्रोल पंपांवर नागरिकांची प्रचंड गर्दी झाली. यापैकी एका पेट्रोल पंपातील इंधनाचा साठा पूर्णपणे संपला.
याविषयी, पेट्रोल पंपाच्या चालकाला विचारले असता त्याने ही अफवा फेटाळून लावली. पेट्रोल-डिझेल नियमित मिळणार आहे, असे त्यांनी लोकांना सांगितले. मात्र, तरीही लोकांनी लांबच लांब रांगा लावून पेट्रोल-डिझेल विकत घेतले.