खुशखबर : अक्षय तृतीया, ईदनिमित्त दुकानांची वेळ वाढवली
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२१ । – हिंदू धर्मियांचा पवित्र सण अक्षय तृतीया आणि मुस्लिम धर्मियांचा पवित्र सण रमजान ईदनिमित्त दुकानांची वेळ वाढवावी आणि इतर दुकाने सुरू ठेवावी अशी मागणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी व नागरिकांनी केली होती. सर्वांच्या मागणीचा विचार करीत तीन दिवस दुकानांची वेळ वाढविण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी काढले आहे.
उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल क्रिमिनल सुमोटो पीआयएल क्रमांक 02/2021 मध्ये दिनांक 26 एप्रिल, 2021 रोजी मा न्यायालयाने पारीत केलेल्या निर्देशास अधिन राहून तसेच दिनांक 13 मे 2021 रोजी रमजान ईद (ईद-उल-फितर) व दिनांक 14 मे 2021 रोजी अक्षयतृतीया हे सण साजरा करण्यात येणार असल्याने या सणानिमित्त लागू करण्यात आलेल्या विशेष निर्बंधामध्ये सुट मिळण्याबाबत लोकप्रतिनिधी व नागरिक हे विनंती करीत असून सदर सणानिमित्त विशेष निर्बंधामध्ये सुट देण्याची बाब जिल्हा प्रशासनाच्या विचाराधीन होती.
त्यानुसार प्रशासनाने खालील आदेश जाहीर केले आहे. दिनांक 12 मे 2021 ते दिनांक 14 मे 2021 या कालावधीत सकाळी 7 ते सकाळी 12 वाजेपावेतो किराणा दुकाने, ड्रायफ्रुट्स दुकाने, भाजीपाला, फळविक्री, अंडी / चिकन / मटन / मासे विक्रीची दुकाने, बेकरी, दुध विक्री केंद्रे सुरु राहतील. सणानिमित्त एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये याकरीता नागरिकांनी आपल्या प्रभागातील / वार्डातील दुकानातून खरेदी करावे. शक्यतो होम डिलिव्हरीस प्राधान्य देण्यात यावे व खरेदीसाठी जातांना नागरिकांनी शक्यतो वाहनाचा वापर टाळावा.
दुकान मालक / चालक यांनी दुकानामध्ये एका वेळेस 5 पेक्षा जास्त ग्राहकांना प्रवेश देऊ नये. तसेच दुकानासमोर गर्दी होऊ नये याकरीता दुकानासमोर वर्तुळ तयार करुन नागरिकांना सोशल डिस्टन्सींगचे पालन करण्याबाबत सूचित करावे. सूटमध्ये दुकानदार व नागरिक यांनी कोविड-19 नियमावलींचे पालन करावे. तसेच नियमांचे उल्लंघन करणा-या आस्थापना, नागरिक यांचेवर स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस विभाग यांनी संयुक्तरित्या कारवाई करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहे.