⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | अभिमानास्पद : जळगावच्या बालवैज्ञानिकांनी तयार केलेले सॅटेलाईट १९ रोजी होणार लाँच

अभिमानास्पद : जळगावच्या बालवैज्ञानिकांनी तयार केलेले सॅटेलाईट १९ रोजी होणार लाँच

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज : १० फेब्रुवारी २०२३ : देशातील ५००० बाल वैज्ञानिकांनी तयार केलेले १५० पिको सॅटेलाईट (PICO satellites) अवकाशात एकाचवेळी प्रक्षेपित करण्याचा जागतिक विक्रम भारत देश १९ फेब्रुवारी २०२३ रोजी करणार आहे. यात जळगाव जिल्हावासियांसाठी अभिमानाची बाब म्हणजे, या बालवैज्ञानिकांमध्ये जळगाव जिल्ह्यातील १३ बालवैज्ञानिकांचा समावेश आहे. यापैकी १२ जणांनी मिळून एक सॅटेलाईट तयार केला असून तो देखील प्रक्षेपित करण्यात येणार आहे. तसेच अवकाशात सॅटेलाईट लाँच करण्यासाठी लागणारे रॉकेट तयार करणार्‍यांच्या टीममध्ये एका बालवैज्ञानिकाचा समावेश आहे.

डॉ. एपीजे अब्दुल कलाम सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल मिशन २०२३ ( Dr APJ Abdul Kalam satellite launch vehicle (SLV) mission-2023)अंतर्गत देशभरातील बालवैज्ञानिकांचा शोध घेण्यात आला. या बालवैज्ञानिकांची निवड झाल्यानंतर त्यांना सॅटेलाईट तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये लिटील व्हॅली इंग्लींश मिडीयम स्कूल कासोदाच्या हर्षदा पाटील, कुणाल तडवी, वेदांत मोरे, मानसी सूर्यवंशी, मोनाली पाटील, वेदांत शिनकर, स्वाती वारे, रुचिका पाटील, अमृता दंडगव्हाळ, मयुरेश पाटील, विकास बारेला, अंकेश पाडवी या १२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या बालवैज्ञानिकांनी आद्रता, जीपीएस अ‍ॅण्ड जीओ टँगिंगवर काम करणारे पीको सॅटेलाईट तयार केले आहे.

हे सर्व विद्यार्थी ८ वी, ९ वी व १० वीचे आहेत. या विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन करुन त्यांच्या कडून हे सॅटेलाईट तयार करुन घेण्यात आले असल्याची माहिती शाळेचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी दिली. विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक विजय महाले यांचे मार्गदर्शन लाभले. यासह सॅटेलाईट लॉच करण्यासाठी आवश्यक असणारे रॉकेट तयार करण्यासाठी ५००० विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली होती त्यातून १०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. यात जळगाव जिल्ह्यातील हर्ष सुर्यकांत पाटील (इयत्ता १० वी) या विद्यार्थ्याचा देखील समावेश आहे. हर्ष देखील लिटिल व्हॅली इंग्लिश मिडीयम स्कूलचा विद्यार्थी आहे.

देशभरातील ५००० बालवैज्ञानिक पूर्ण करणार डॉ.कलाम यांचे स्वप्न पूर्ण

देशाचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉ. कलाम यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी २०१५ मध्ये डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशनची (Dr APJ Abdul Kalam organisation) स्थापना करण्यात आली. डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन, हाऊस ऑफ कलाम, रामेश्वरम स्पेस झोन इंडिया, चेन्नई आणि मार्टिन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. एपीजे अब्दुल कलाम सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल मिशन २०२३ राबविण्यात आले. या मिशन अंतर्गत देशभरातील महाविद्यालये आणि शाळांमधील (इयत्ता सहावी ते बारावीपर्यंत) विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. यास ५००० विद्यार्थी पात्र ठरले होते. या विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देवून बालवैज्ञानिकांकडून १५० पिको उपग्रह अर्थात सॅटेलाईट तयार करुन घेण्यात आले.

हे १५० पिको सॅटेलाईट १९ फेब्रुवारी २०२३ रोजी तामिळनाडू मधील कांचीपुरम जिल्ह्यातील पट्टीपुलम गावातून प्रक्षेपित करण्यात येणार आहेत. पिको उपग्रह पृथ्वीपासून १० किमी उंचीवर स्थापित केले आहेत. जगात पहिल्यांदाच असे घडणार आहे जेव्हा एकाच वेळी १५० पिको उपग्रह प्रक्षेपित केले जातील, त्यानंतर जागतिक विक्रम प्रस्थापित होईल. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, असिस्ट बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये या विक्रमाची नोंद होणार आहे. या उपग्रहांद्वारे संकलित केलेल्या डेटाचा वापर वातावरणातील ऑक्सिजन, ओझोन आणि इतर वायूंची माहिती गोळा करण्यासाठी केला जाईल.

author avatar
डॉ. युवराज परदेशी
पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.