जळगाव लाईव्ह न्यूज | २४ जानेवारी २०२३ | लावणी क्विन व सोशल मीडियास्टार म्हणून अवघ्या महाराष्ट्रात प्रसिध्द असणारी गौतमी पाटील हिच्यावर सातारा कोर्टाने गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. यामुळे गौतमी पाटील पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. गौतमीच्या नृत्याचे जितके चाहते आहेत, तितकेच तिच्या सौंदर्यावर आणि फॅशनवर देखील फिदा आहेत. मात्र, लावणी करतांना गौतमी अश्लिल हावभाव करते म्हणून तिच्यावर सातत्याने टीका होत असते. गौतमी ही पुण्याची किंवा कोल्हापूरची आहे, असे अनेकांना वाटते मात्र तिचा जळगाव व धुळे जिल्ह्याशी जवळचा संबंध आहे. याबद्दल आज आपण सविस्तर माहित जाणून घेणार आहोत.
गौतमी पाटील हे नाव आता महाराष्ट्राला नवं राहिलेलं नाही. गौतमी पाटील ही तिच्या नृत्यामुळे खूप प्रसिद्ध आहे. चुकीचे हावभाव करुन लावणी केल्याप्रकरणी तिच्यावर सर्व स्तरातून टिका करण्यात आली होती. असे असले तरी तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. तिचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी होत असते. गौतमीचे नाव सर्वात प्रथम राज्यभर चर्चेत आलं ते सांगली जिल्ह्यातील एका कार्यक्रमामुळे! सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातल्या बेडग या ठिकाणी झालेल्या एका कार्यक्रमात गौतमी पाटीलचे नृत्य पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली. या गर्दीत एकाचा मृत्यू झाला होता. यामुळे प्रचंड गोंधळ उडाला होता.
गौतमी पाटील ही मुळची धुळ्याची आहे. सिंधखेडा या गावात तिचा जन्म झाला. तिथेच ती लहानाची मोठी झाली. तिथे तिने आठवीपर्यंत शिक्षण केलं. चोपडा हे तिच्या वडिलांचे गाव आहे. गौतमीचा जन्म झाला तसं तिच्या वडिलांनी तिला आणि तिच्या आईला सोडले. त्यानंतर आईच्या वडिलांनी गौतमीचे संगोपन केले. त्यामुळे ती आपल्या आजोळीच शिंदखेडा येथे लहानाची मोठी झाली. गौतमी आठवीला असताना उदरनिर्वाहासाठी तिचं कुटुंब पुण्यात आलं. दरम्यान आई छोटी-मोठी कामं करून घर चालवायची. या काळात गौतमीच्या आईचा अपघात झाला यामुळे घरची जबाबदारी गौतमीवर आली. गौतमी सुरुवातीपासून पुण्यातील विश्व कला नृत्य अकादमी येथे नृत्याचं प्रशिक्षण घेत होती. त्यामुळे नृत्य क्षेत्रातच काम करुन घरचा उदरनिर्वाह करण्याचा तिने निर्णय घेतला.
सुरुवातीच्या काळात बॅक डान्सर म्हणून काम केलं. नंतर पुढे आघाडीची लावणी कलाकार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. ‘गौतमी पाटील ऑर्केस्ट्रा शो’च्या माध्यमातून पुणे, कोल्हापूर, सांगली आदी जिल्ह्यांमध्ये गौतमीचे लावणीचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होत असतात. हा पूर्णवेळ लावणीचा कार्यक्रम नाही. येथे डिजेच्या गाण्यावर नृत्य केले जाते. अशाच एका कार्यक्रमात अंगावर पाणी ओतून, हावभाव करून नाचताना गौतमीचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी गौतमीची चांगलीच कानउघाडणी केली होती. गौतमी पाटीलने त्यावेळी आपली चूक मान्य करून माफीही मागितली होती.
गुन्हा का दाखल झाला
गौतमी आपल्या कार्यक्रमात अश्लिल हावभाव करते, शॉर्ट कपडे घालते हे असले प्रकार लोककलेत व लावणीत येतच नाहीत. लावणीकडे बघण्याचा महिलांचा दृष्टीकोन बदलत असताना गौतमीने लावणीची संस्कृती जपावी. तिने लावणीच करावी अश्लीलपणा करू नये असं म्हणत तिच्यावर टीका करण्यात आली होती. अश्लील डान्स करत असल्याचा आरोप करत प्रतिभा शेलार यांनी गौतमी पाटील हीच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर सातारा कोर्टाने तिच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.