जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जानेवारी २०२३ । गेल्या काही दिवसांपासून उभ्या वाहनांमधून बॅट-या चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली बघायला मिळत आहे. नशिराबादसह भादली बुद्रूक व आसोदा शिवारातून तीन ट्रॅक्टरमधून चोरट्यांनी बॅट-या लांबविल्या असून याप्रकरणी सोमवारी नशिराबाद आणि तालुका पोलिस ठाण्यात चोरट्यांविरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
आसोदा येथे सचिन मधुकर माळी हे राहतात. त्यांची १६ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता त्यांच्या मालकीचा ट्रॅक्टर आसोदा-भादली रस्त्यावर उभा केला होता. मध्यरात्री चोरट्यांनी बॅटरी चोरून नेली. पहाटे ५ वाजता माळी यांना जाग आल्यावर ते ट्रॅक्टरजवळ आले. त्यावेळी त्यांना ४ हजार रूपये किंमतीची बॅटरी चोरीला गेल्याची दिसून आली. अखेर महिन्याभरानंतर त्यांनी सोमवारी तालुका पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खळ्यातील ट्रॅक्टरमधून बॅटरी चोरली…
भादली बुद्रूक येथील देविदास कोल्हे यांनी नशिराबाद रस्त्यावरील त्यांच्या खळ्यामध्ये २६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता ट्रॅक्टर उभा करून घरी निघून गेले होते. मध्यरात्री चोरट्यांनी त्यांच्या ट्रॅक्टरमधील ५ हजार रूपये किंमतीची बॅटरी चोरून नेली. २७ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता कोल्हे हे खळ्यात आल्यानंतर बॅटरी चोरीची घटना उघडकीस आली होती. त्यांनी वीस दिवसानंतर सोमवारी नशिराबाद पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. तसेच भादली बुद्रूक येथील अशेाक नारखेडे यांच्या कडगाव रस्त्यावरील खळ्यातील एमएच.१९.सी.९७१६ क्रमांकाच्या ट्रक्टरमधील ११ जानेवारी रोजी दुपारी चोरट्याने ६ हजार ५०० रूपये किंमतीची बॅटरी लांबविली. याप्रकरणीही नशिराबाद पोलिस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे.