जळगाव लाईव्ह न्यूज । १५ जानेवारी २०२३ । चोपडा विधानसभा मतदारसंघाच्या शिंदे गटाच्या आमदार लता सोनवणे यांना यांना औरंगाबाद खंडपीठाचा मोठा दिलासा मिळाला आहे. कारण त्यांच्या विरोधात माजी आमदार जगदीशचंद्र वळवी यांनी जात प्रमाणपत्र अवैध असल्याबाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून अपात्र घोषित करावे, अशी मागणी केली होती. पण जात प्रमाणपत्राची वैधता आमदार खासदार यांना लागू नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे त्यांची ही याचिका औरंगाबाद खंडपीठाने फेटाळल्याची माहिती आमदार लता सोनवणे यांचे पती माजी आमदार चंद्रकांत सोनवणे आणि त्यांचे वकील एडवोकेट वसंत भोलानकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पराभूत आमदार डॉक्टर जगदीशचंद्र वळवी यांनी आमदार लता सोनवणे यांच्याविरोधात धुळ्यात जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली होती. तेव्हा लता सोनवणे यांचा जातीचा दाखला अवैध ठरवण्यात आला होता. हाच निर्णय उच्च आणि सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवला.
त्यानंतर डॉक्टर जगदीशचंद्र वळवी यांनी राज्यपालांकडे अर्ज करत लता सोनवणे यांचे पद रिक्त दाखवावे यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाला शिफारस करावी अशी मागणी केली. यावर राज्यपालांनी निर्णय न घेतल्याने खंडपीठात याविरोधात याचिका दाखल केली होती.
लता सोनवणे यांनी हस्तक्षेप अर्ज दाखल करत या प्रकरणी राज्यपालांना प्रतिवादी करता येत नसल्याचा युक्तिवाद केला. वळवी यांनी याआधीच निवडणूक याचिका दाखल केलीय. शिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय पीठाच्या निवाड्याचा आधार घेतला आणि त्यानुसार निवडणुकीनंतर अपात्रतेबाबत राज्यपाल भारताच्या निवडणूक आयोगाचा सल्ला घेऊ शकतात. तसंच जात प्रमाणपत्र पडताळणी कायदा फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांना लागू होतो.
आमदार आणि खासदारांना उमेदवारी अर्ज दाखल करताना जात प्रमाणपत्राची गरज भासत नाही. केवळ अर्जात अनुसूचित जाती अथवा जमाती असा उल्लेख करावा लागतो असा युक्तिवाद सोनवणे यांच्यावतीने करण्यात आला होता. न्यायालयाने सोनवणे यांचा हा युक्तिवाद मान्य करत डॉक्टर वळवी यांची याचिका फेटाळून लावली.