⁠ 
गुरूवार, नोव्हेंबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | “शावैम” मध्ये एक वर्षाच्या बालकाला मृत्यूच्या दाढेतून आणले बाहेर

“शावैम” मध्ये एक वर्षाच्या बालकाला मृत्यूच्या दाढेतून आणले बाहेर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०८ मे २०२१ । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बालरोग व चिकित्साशास्त्र विभागात मृत्यूशी झुंज देणाऱ्या एक वर्षाच्या बालकाला वाचविण्यात वैद्यकीय पथकाला यश आले आहे. याबद्दल अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी विभागाचे कौतुक करून बालकाला रुग्णालयातून सुटी दिली आहे.

बोदवड तालुक्यातील जुनोने येथील एक वर्षीय बालक हे ताप, सर्दी, खोकला व श्वास घेण्यास १७ एप्रिल रोजी त्रास होऊ लागला होता. तसेच तो कोरोनाबाधित देखील होता. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करताना त्याची प्रकृती अत्यंत गंभीर झालेली होती. त्याच्या प्रयोगशाळेतील तपासण्या, एक्स रे याद्वारे त्याच्या आजारावर नियंत्रण  ठेवण्यासाठी बालरोग व चिकित्साशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. बाळासाहेब सुरोशे यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांनी प्रयत्न केले.

तब्बल १२ दिवसांनी प्रकृतीत सुधारणा जाणवून आल्यावर वैद्यकीय पथकाला यश आले. सलग १८ दिवस ऑक्सिजन व त्यानंतर औषधोपचार करून त्याची मृत्यूची झुंज थांबवून त्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यास २३ दिवसांनी बालरोग विभागाला यश आले. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सुरोशे यांच्यासह डॉ. गिरीश राणे, डॉ. अतुल गाजरे, डॉ. नीलांजना गोयल, डॉ. विश्वा भक्ता, वॉर्ड इन्चार्ज संगीता शिंदे व नर्सिंग स्टाफ यांनी परिश्रम घेतले.

शुक्रवारी ७ मे रोजी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत देवरे यांच्या उपस्थितीत बालकाला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यावेळी बालरोग विभागाचे प्रमुख डॉ.सुरोशे, डॉ. अतुल गाजरे, डॉ. नीलांजना गोयल, डॉ. विश्वा भक्ता, अधिसेविका कविता नेतकर आदी उपस्थित होते.

दोन महिन्यात ३८ बालकांवर उपचार  

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरोग विभागात मार्च ते मे या दोन महिन्यात तब्बल ३८ कोरोना पॉझिटिव्ह बालकांवर उपचार झाले आहे. त्यात गंभीर १४ तर २४ इतर बालकांवर उपचार झाले. यात ३० बालकांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सद्यस्थितीत ६ कोरोनाबाधित रुग्ण दाखल असून त्यात २ गंभीर आहे. बालकांना कोरोनाची कुठलीही लक्षणे जाणवली तर उशीर न करता तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करावे, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.