⁠ 
मंगळवार, मे 7, 2024

दोन गावठी पिस्तूल, 15 जिवंत काडतुसे घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला ठोकल्या बेड्या

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२३ । गावठी बनावटीचे दोन पिस्तूल आणि १५ जिवंत काडतुसे घेऊन दहशत माजविणाऱ्या संशयित आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या आहे. नमीर खान आसिफ खान (वय-१९ रा. शनिपेठ जळगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत असे की, शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या काट्याफाईल परिसरात संशयित आरोपी नमीर खान आसिफ खान हा सोबत २ गावठी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत कडतुस घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथकाने शुक्रवारी २९ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता काट्याफाईल परिसरात कारवाई करत संशयित आरोपी नामीर खान याला ताब्यात घेतले. त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याजवळून गावठी बनावटीचे २ पिस्तूल आणि १५ जिवंत काडतुसे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ प्रमोद लाडवंजारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी याच्या विरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे करीत आहे.