जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जानेवारी २०२३ । जळगाव जिल्ह्यात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशातच जळगाव शहरातील अशोक नगरात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातून ३ लाख ९७ हजार रूपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा मुद्देमाल लंपास केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, सनी विकास सोनार (वय-३२) रा. अशोक नगर, अयोध्या नगर परिसर, जळगाव हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. सोमवारी २ जानेवारी रोजी सायंकाळी ६ ते ८ वाजेच्या दरम्यान त्याचे घर बंद असताना अज्ञात चोरट्याने बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत लाकडी कपाटातून ३ लाख ९७ हजार रूपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले.
तसेच घरातील सामान अस्ताव्यस्त असलेला दिसून आला. या संदर्भात सनी सोनार याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून मंगळवारी ३ जानेवारी रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी करीत आहे.