जळगाव लाईव्ह न्यूज | १५ डिसेंबर २०२२ | कोरोनानंतर सर्वच क्षेत्रात डिजिटल व्यवहार वाढले आहेत. यास रेल्वे देखील अपवाद नाही. पूर्वी रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी तिकीट खिडकीसमोर दिसणार्या लांबच लांब रांगा आता दिसत नाही. कारण आता बहुतांश प्रवासी ऑनलाईन तिकीटाला प्राधान्य देत आहेत. भुसावळ रेल्वे विभागाच्या एका आकडेवारीनुसार, गत नोव्हेंबर महिन्यात तब्बल ७७ टक्के रेल्वे प्रवाशांनी ऑनलाईन तिकीट काढले तर केवळ २३ टक्के प्रवाशांची तिकीट खिडकी समारे उभे राहून तिकीट काढले.
वेबसाईट किंवा अॅप्सच्या मदतीने ऑनलाईन टिकीट काढता येते. नोव्हेंबर महिन्यात भुसावळ रेल्वे विभागाला १३५ कोटी ३६ लाखांची कमाई यातून झाली. यापैकी ७७ टक्के कमाई ऑनलाइन बुकिंगद्वारे झाली आहे. उर्वरित २३ टक्के कमाई स्टेशन विंडो तिकिटांद्वारे झाली आहे. भुसावळ विभागाला कोचिंगमधून ६६.८९ कोटी महसूल मिळाला. माल विक्रीतून ५८.३८ कोटी, पार्किंगमधून १४ लाखांचे उत्पन्न मिळाले. भाडे नसलेला महसूल ४० लाख आहे. यात ऑनलाईनचा वाटा मोठा आहे.
आयआरसीटीसीवर अशा पध्दतीने करा ऑनलाईन तिकीट बुक
- तुमच्या नोंदणीकृत युजर आयडी, पासवर्डद्वारे तुमच्या आयआरसीटीसी खात्यात लॉग इन करा.
- त्यानंतर तुम्हाला ‘तुमचे तिकीट बुक करा’ पेज दिसेल
- तेथे प्रवासाची तारीख आणि कुठून कुठे प्रवास करायचा आहे, याचे तपशील भरा.
- निवडलेल्या ट्रेनमध्ये तिकीट बुक करण्यासाठी, ‘आता बुक करा’ वर क्लिक करा.
- हे प्रवासी आरक्षण पृष्ठावर नेईल. पृष्ठाच्या डाव्या बाजूला प्रदर्शित झालेल्या ट्रेनचे नाव, स्थानकाची नावे, वर्ग आणि प्रवासाची तारीख तपासा.
- प्रवाश्यांची नावे, वय, लिंग, बर्थ प्राधान्य एंटर करा.
- योग्य तपशील दिल्यानंतर, ‘कंटीन्यू बुकिंग’ वर क्लिक करा.
- तिकीट तपशील, एकूण भाडे आणि बर्थची उपलब्धता प्रदर्शित केली जाते.
- सर्व तपशील तपासल्यानंतर पेमेंट प्रक्रियेसाठी ‘कंटिन्यू बुकिंग’ वर क्लिक करा
- वापरकर्ते क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, पेमेंट वॉलेट आणि एकाधिक पेमेंट सेवा इत्यादी वापरून पैसे देऊ शकतात
- पसंतीचा पेमेंट पर्याय निवडा आणि ‘पेमेंट करा’ पर्यायावर जा
- यशस्वी पेमेंट आणि बुकिंग केल्यानंतर, तिकीट पुष्टीकरण पृष्ठ प्रदर्शित केले जाते
- तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एसएमएसच्या स्वरूपात ओटीपी प्राप्त होईल.
- यानंतर बुकिंग पुष्टीकरण मेल तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर प्राप्त होईल.
ऑनलाइन तिकीट बुकिंगबाबत झालेत मोठे बदल
देशभरातील लाखो रेल्वे प्रवासी केवळ ऑनलाइन तिकीट बुकिंग करतात. आता आयआरसीटीसीने ऑनलाइन तिकीट बुकिंगबाबत काही मोठे बदल केले आहेत. जर तुम्ही रेल्वे प्रवासासाठी ऑनलाईन तिकीट बुक करत असाल तर आयआरसीटीसीने केलेले अपडेट जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. आयआरसीटीसी नियमांनुसार ऑनलाइन तिकीट बुकिंग करण्यापूर्वी मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडी ची पडताळणी करणे आवश्यक आहे. ज्या प्रवाशांनी कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर काही महिन्यांपासून वेबसाइट किंवा अॅपद्वारे तिकीट बुक केले नाही त्यांच्यासाठी हा नवा बदल लागू होईल. तुम्ही अद्याप तुमचे खाते व्हेरिफाईड केले नसल्यास, व्हेरिफिकेशन प्रक्रिया लवकरच पूर्ण करा.
असे करा मोबाइल आणि ईमेल व्हेरिफिकेशन
आयआरसीटीसी अॅप किंवा वेबसाइटवर जाऊन व्हेरिफिकेशन विंडोवर क्लिक करा.
आता तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी टाका.
दोन्ही माहिती प्रविष्ट केल्यानंतर, व्हेरिफिकेशन बटणावर क्लिक करा.
येथे क्लिक केल्यावर तुमच्या मोबाइलवर ओटीपी येईल, तो टाकून मोबाइल नंबर व्हेरिफाईड करा.
ई-मेल आयडीवर मिळालेला कोड टाकल्यानंतर तुमचा मेल आयडीही पडताळला जाईल.
जनरल तिकीट देखील काढा ऑनलाईन
आधी मोबाइलच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने आरक्षित तिकीट काढण्याची सुविधा प्रवाशांना मिळत होती. मात्र, आता जनरल तिकीट देखील ऑनलाईन काढता येते. यासाठी तुम्हाला रेल्वे विभागाने विकसीत केलेले युटीएस अॅप डाऊनलोड करावे लागेल. अॅप डाऊनलोड केल्यानंतर यावर मोफत नोंदणी करावी लागते. या अॅपच्या माध्यमातून अनारक्षित तिकीट, सीजन तिकीट, प्लॅटफॉर्म तिकीट, काढता येणार आहे. सीजन तिकीटासाठी आता दहा दिवसापूर्वी बुकींग करता येणार आहे. योग्य प्रवासाचे तिकीट काढल्यानंतर ऑनलाइन पेमेंट केल्यानंतर मोबाइलवर तिकीट तयार होईल हे तिकीट प्रवासादरम्यान तिकीट निरीक्षकाला दाखवता येणार आहे.