राज्यपालांचे शिवाजी महाराजांबद्दल पुन्हा वादग्रस्त विधान, गुलाबराव पाटील म्हणतात..
जळगाव लाईव्ह न्यूज । २० नोव्हेंबर २०२२ । राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) हे कोणत्या ना कोणत्या विधानामुळे कायम चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल नवं वादग्रस्त विधान केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते. तर नितीन गडकरी हे सध्याचे आदर्श आहेत’, असं राज्यपालांनी म्हटलं होतं. या प्रकरणावर आता शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao patil)यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले गुलाबराव पाटील?
राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श आहेत. यावेळी जी कामे होत आहेत ती चांगल्या पद्धतीने नितीन गडकरी करत असल्याने राज्यपालांची ही भावना असेल. या काळात चांगली कामे होत असल्याने राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला असावा, अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
याशिवाय गुलाबराव पाटील यांनी यावेळी बोलताना विरोधकांवरही शायरीतून निशाणा साधला आहे. “बदनाम तो वो होते है जो बदनामी से डरते है . हम तो वो है जिसे बदनामी डरती है ” अशा आपल्या खास अंदाजामध्ये गुलाबराव पाटलांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. तर आम्ही मुसलमानांच्या विरोधात असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. मात्र विरोधकांच्या या आरोपालाही गुलाबराव पाटलांनी आपल्या खास शयारीत उत्तर दिले आहे.