जळगाव लाईव्ह न्यूज । १९ नोव्हेंबर २०२२ । एरंडोल येथे २९ नोव्हेंबर पासुन भरणाऱ्या नथ्थुबापू उर्स याञोत्सवासाठी भजे,जिलेबी सह इतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांना सन २०१८ प्रमाणे एकाच ठिकाणी जागा द्यावी, अशी मागणी खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी मुख्याधिकारी तथा प्रशासक विकास नवाळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. विशेष म्हणजे, या मागणीप्रमाणे जागा उपलब्ध करून दिल्यास याञेकरूंची मोठ्या प्रमाणात सोय होणार आहे.
तसेच उर्सात येणाऱ्या याञेकरूंसाठी न.पा. प्रशासनाने याबाबत योग्य ती कार्यवाही करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रत्येक खाद्यपदार्थ विक्रेता आपल्या सोयीच्या असलेल्या जागी त्याचे दुकान थाटतो परंतू त्या जागेवरील दैनंदिन/साप्ताहीक विक्रेते तेथील दुकानांचे स्थायी/अस्थायी मालक हे आपल्याच मालकीची जागा असल्याचे भासवुन खाद्यविक्रेत्यांकडुन अवाजवी पैसे उकळल्याचे प्रकार याआधी ही झालेले आहेत. पैश्यांसाठी भांडणे देखिल होतात या मनमानीला आळा बसवणे गरजेचे आहे असे निवेदनात नमूद केले आहे.
आठवडे बाजाराच्या मध्यभागी असलेल्या भवानी माता मंदिराच्या बाजूस असलेले सरकारी जागेवरील अतिक्रमण धारक उर्साच्या १५दिवसांच्या कालावधीत दुकानदारांकडून अव्वा च्या सव्वा पैसे मागतात. मागील ३वर्षांपूर्वी नगरपालिकेकडून बांधण्यात आलेल्या आठवडे बाजार संकुलाचे बांधकाम चालू असल्याने त्याठिकाणी त्यावेळी बांधकामाचे साहीत्य पडून होते या कारणास्तव महादेव मंदीर परीसरात खाद्यविक्रेत्यांना पर्यायी जागा देण्यात आली होती. या वर्षी सुध्दा उर्सात खाद्यविक्रेत्यांना महादेव मंदीर परीसरात एकाच ठिकाणी जागा देण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली असुन खाद्यपदार्थ विक्रेता संघटनेचे प्रमुख आर.जे.साळी यांनी खाद्यविक्रेत्यांतर्फे नगरपालिकेला साकडे घातले आहे.