जळगाव लाईव्ह न्यूज । ०३ मे २०२१ । चाळीसगाव व नांदगाव परिसरातील वारकरी संप्रदायात आपल्या विनम्र स्वभावासाठी प्रसिद्ध असणारे चाळीसगाव तालुक्याचे भुषण,ह.भ.प. सोमनाथ महाराज नाईकवाडे हातगावकर यांचे ४-५ दिवसांपूर्वी कोरोनामुळे दुःखद निधन झाले होते.
सोमनाथ महाराजांच्या अकाली निधनाने वारकरी संप्रदायाचीच नव्हे तर चाळीसगाव तालुक्यातील अध्यात्मिक क्षेत्राची न भरून येणारी हानी झाली आहे.त्यांची घरची परिस्थिती बेताची असून त्यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांवर मोठं संकट कोसळले आहे.अशा वेळी एक वारकरी कुटुंब संकटात असतांना दुसऱ्या वारकऱ्याचा मुलगा मदतीला धावून आल्याचा प्रत्यय तालुका वासियांना आ.मंगेशदादा चव्हाण यांच्या रुपाने आला आहे.
आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी कै.सोमनाथ महाराज नाईकवाडे हातगावकर यांच्या कुटुंबियांना ५० हजार रुपये रोख मदत व मुलीचे लग्न होईपर्यंत दरवर्षी १० हजार रुपये देण्याचे घोषित केले आहे.वारकरीपुत्र आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे समस्त वारकरी बांधवांच्या वतीने विविध वारकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.
मीदेखील वारकरीपूत्र, वारकरी कुटुंबाला वार्यावर सोडणार नाही
“ह.भ.प. सोमनाथ महाराज नाईकवाडे, हातगावकर यांचे निधन ही चाळीसगाव तालुक्याच्या अध्यात्मिक क्षेत्राची हानी आहे, मी देखील वारकऱ्याचा मुलगा आहे, संकटात असणाऱ्या वारकरी कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नाही.”
आ.मंगेश रमेश चव्हाण
आमदार, चाळीसगाव