जळगाव जिल्हा

विपरीत परिस्थितीच्या खिंडीत अडकलेल्या जळगावच्या उद्योगांना ‘ग्रीप’ कशी मिळणार?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । चिन्मय जगताप । जळगावमध्ये उद्योग करणाऱ्या उद्योगांची स्थिती अतिशय दयनीय झाल्याचे निदर्शनास येत असून समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या उद्योगांना ग्रीप कशी मिळणार याकडे कोणीतरी लक्ष देण्याची गरज असल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे. जळगाव सारख्या ठिकाणी उद्योग करणं आधीच कठीण असताना काही धाडसी उद्योजक इथे उद्योग करत आहेत. सध्या पाहायला गेलो तर सध्या बाजाराची स्थिती पाहता या सर्वांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. मात्र याकडे औद्योगिक विकास महामंडळाचे लक्ष नसल्याचे निदर्शनास येत आहे. महामंडळासोबतच जिल्ह्यातील राजकीय नेते देखील उद्योगांकडे लक्ष देण्यास तयार नाही.

कोरोनाचा कहर ओसरल्यानंतर संपूर्ण जगामध्ये आर्थिक मंदीचे सावट पाहायला मिळत आहे. जळगावात काही फार वेगळी परिस्थिती पाहायला मिळत नाही. उद्योग सुरु असले तरी घाऊक विक्रेते मात्र उधारीवर माल खरेदी करीत आहे. उधारी वाढतच चालली असल्याने जळगावमध्ये असलेले उद्योग जवळजवळ डबघाईला आल्याचे पाहायला मिळत आहे. सध्याच्या विपरीत काही धाडसी उद्योजक धाडस करून याठिकाणी उद्योग करू इच्छितात. धडपड्या उद्योजकांना काही प्रमाणात पाठबळ मिळाल्यास नक्कीच हे उद्योजक नवीन काहीतरी करू शकतील यात वाद नाही मात्र ते पाठबळही देण्यात महामंडळ व स्थानिक राजकारणी अपयशी ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे.

सरकारने अशा उद्योजकांना पाठबळ देण्यासाठी ठाम धोरण आखणं अतिशय गरजेचे आहे. मात्र आपल्याकडे विपरीत धोरण आखली जात असल्याने उद्योजकांचे खच्चीकरण होत आहे. कित्येक उद्योजकांकडे सध्या सुरू असलेल्या आर्थिक मंदीमुळे त्यांच्याकडे मागणी नाही. पर्यायी आपला तोटा कमी करण्यासाठी त्यांनी आपली कंपनीच बंद करून ठेवली आहे. याचबरोबर जिल्ह्यामध्ये झालेल्या शेतीच्या दुर्दशेमुळे एकूण बाजारात होणरी गुंतवणूकच कमी झाली आहे. फिरणारा पैसा कमी झाला आहे. पर्यायी पाहायला गेलो तर या मंदीमध्ये उद्योजक टिकणे अतिशय कठीण आहे. तरीही उद्योजक चिकाटीने आपला उद्योग करत आहेत.

उद्योगांना लागणारे साधे रस्ते, मुबलक वीज आणि पाणी हे तरी त्यांना मिळावं अशी त्यांची साधी अपेक्षा आहे मात्र तेही या उद्योजकांना मिळणं कठीण झालं आहे. एमआयडीसीमध्ये असणाऱ्या रस्त्यांची चाळण झाली आहे. वीज कधी येते कधी जाते. पाण्याचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. जमिनीचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. अशा चारही बाजूंनी उद्योजक अडकून पडला आहे तरीही खिंड लढवत आहे. खिंड लढवणाऱ्या या उद्योजकांना थोडूशा पाठबळाची गरज आहे. मात्र ती देखील महामंडळ व इतर राजकारणी लोक देण्यास तयार नाही.

जळगाव एमआयडीसीमध्ये मोठे उद्योग आले तर छोट्या उद्योजकांना अजून चांगली चालना मिळेल असे या उद्योजकांना वाटते. मात्र जर छोट्या उद्योजकांची ही दैना झाली असेल तर मोठे उद्योग येणार तरी कसे? हा देखील प्रश्न आहे. चारहीबाजूंनी अडकलेल्या या उद्योजकांना येणाऱ्या काळात दिलासा मिळेल अशी अपेक्षा आजवर कायम आहे मात्र ती अपेक्षा सरकार बदलले, नेते बदलले तरीही ते अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशीच ठरत आहे. जळगावच्या उद्योगांना सध्या तरी कोणतीही ‘ग्रीप मिळण्याची शक्यता नाही.

Related Articles

Back to top button