धक्कादायक : शेतकऱ्याचे हात-पाय बांधून तीन म्हशी चोरल्या!
जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२२ । जळगाव जिल्ह्यात पशुधन चोरी होण्याच्या घटना दररोज घडत आहे. आचेगाव, गोळेगाव रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतातून चोरट्यांनी शेतकऱ्याचे हात-पाय बांधत ३ म्हशी चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ तालुक्यातील आचेगाव येथील विठ्ठल लक्ष्मण भोळे यांच्या मालकीचे आचेगाव ते गोळेगाव रस्त्यावर शेत आहे. दि.१९ ऑक्टोबर २०२२ रोजी ते शेतातील गोठ्यात असलेल्या खोलीत झोपलेले होते. रात्री १०.३० च्या सुमारास दोन चोरट्यांनी खोलीत प्रवेश करीत विठ्ठल भोळे यांचे हात पाय दोरीने बांधले.
खोलीचा दरवाजा बाहेरून कडी लावून घेत चोरट्यांनी तीन म्हशी चोरून नेल्या. याप्रकरणी वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी करीत आहेत. पशुधन चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरत असून पूर्वी चाळीसगाव तालुक्यात असलेले चोरीचे लोण सध्या सर्वत्र पसरले आहे.