राज ठाकरेंचं पुन्हा पत्र ; आता शिंदे-फडणवीस सरकारकडे केली ‘ही’ मागणी

ऑक्टोबर 20, 2022 2:28 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑक्टोबर २०२२ । राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाया गेलेली आहेत. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. यातच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पत्र लिहिले आहे. Raj Thackeray letter to Shinde-Fadnavis government

shinde fadanvis raj thakre jpg webp

त्यात राज ठाकरे यांनी ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा, अशी मागणी केली आहे. तसेच कोरडवाहू आणि बागायती शेतीसाठी शेतकऱ्यांना जी प्रतिहेक्टरी नुकसान भरपाई दिली जाते ती पुरेशी नाही तिचा देखील पुनर्विचार करावा, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे.

राज ठाकरे यांनी काय म्हटलं आहे पत्रात?

प्रति,
सन्मा. श्री. एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.

सस्नेह जय महाराष्ट्र !

महोदय,
ह्या वर्षी मान्सूनचा मुक्काम लांबला आणि त्यात परतीच्या पावसाने तर कहर केला. ह्या परतीच्या पावसाने खरीप पीकांचे अपरिमित नुकसान केलं आहे आणि एकूणच हवामान पाहता रब्बी हंगामाबाबतीतही शेतकरी बांधव चिंतातुर आहे. ऐन पीक काढणीच्या वेळेस हा पाऊस आल्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत पीक वाया गेलं आहे. ह्यावर सरकारने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत हे चांगलंच आहे, पण तेवढं पुरेसं नाही. सध्याची परिस्थिती पाहिली तर लक्षात येईल की शेतकऱ्यांचं राज्यभर झालेलं नुकसान इतकं मोठं आहे की राज्य सरकारने ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा.

सरकारने पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत, पण पूर्वानुभव असा आहे की सरकार पंचनाम्याचे आदेश देतं पण प्रशासकीय पातळीवर ते पंचनामे नीट होत नाहीत आणि गरजू शेतकरी नेहमीच उपेक्षित राहतो. त्यामुळे सरकारने हे पंचनामे नीट होतील हे पहावं आणि परिस्थितीचा युद्धपातळीवर आढावा घेऊन ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा आणि सध्या कोरडवाहू तसंच बागायती शेतीसाठी शेतकऱ्यांना जी प्रतिहेक्टरी नुकसान भरपाई दिली जाते ती पुरेशी नाही तिचा देखील पुनर्विचार करावा.

दिवाळी हा आनंदाचा सण, म्हणून खरंतर लॉकडाऊनच्या संकटकाळानंतर शेतकरीही दिवाळी धूमधडाक्यात करण्याच्या मनस्थितीत असणार, अशा वेळी त्यांना दिलासा देऊन त्यांचीही दिवाळी अतिशय आनंदात साजरी होईल ह्याकडे राज्य सरकारनं कटाक्षानं लक्ष द्यावं ही नम्र विनंती.

आपला नम्र
राज ठाकरे

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now