खासगी ट्रॅव्हल्स कडून करण्यात येणारी लूट थांबवावी – युवासेना
Jalgaon News- जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑक्टोबर २०२२ । खासगी वाहतूक बस, ट्रॅव्हल्स कडून सणाच्या काळात अवास्तव प्रवासभाडे आकारून होणारी आर्थिक लूट त्वरीत थांबवावी अशी मागणी युवासेना जळगाव जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली. उपप्रादेशीक परिवहन अधिकारी श्याम लोही यांना बेकायदा तिकीट आकारणी विरोधात कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन देण्यात आले.
यावेळी युवासेना उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव विराज कावडीया, जिल्हा युवाधिकारी पियुष गांधी, जिल्हा समन्वयक जितेंद्र बारी, विधानसभा युवाधिकारी अमित जगताप, लाकेश पाटील, उमाकांत जाधव, कॉलेज कक्ष अधिकारी प्रितम शिंदे, यश लोढा, जयेश नेवे, मयुर माळी, यश मोरे, विशाल सोनार, चेतन चौधरी, निखील वाणी आदि. युवासैनिक उपस्थित होते. याबाबत बोलताना विराज कावडीया म्हणाले की, दिवाळीच्या निमित्ताने जळगावहून बाहेरगावी खासगी बस आणि ट्रॅव्हल्स तर्फे जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यात नौकरदार आणि विद्यार्थ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे.सणाच्या तोंडावर केलेली ही भरमसाठ भाडेवाढ यामुळे दिवाळी साजरी करण्याआधीच दिवाळं निघेल अशी परिस्थीती आहे. अशाने अराजकता माजेल. तसेच खासगी वाहने आणि ट्रॅव्हल्ससाठी भाडे निश्चिती मोटर व्हेईकल ॲक्टनुसार करण्यात आली असून ती एस.टी. भाडेपेक्षा ५०% अधिक आहे. म्हणजेच एस.टी. चे भाडे दोनशे रूपये असेल तर खासगी बस चालकांना तिनशे तिकीट घेता येते. प्रशासनाने प्रवाशांची आर्थिक लूट करणाऱ्यांवर कारवाई करावी. प्रशासनाने तक्रारी आल्यानंतर संबंधितांवर योग्य वेळेत कारवाई केली नाही तर युवासेनेतर्फे तीव्र आंदोलन केले जाईल असा ईशाराही युवासेनेतर्फे देण्यात आला.
युवासेनेतर्फे प्रमुख मागण्या
ज्यादा भाडे आकारणी करणाऱ्या बसचालकांची नोंदणी रद्द करावी.
नियमानुसार भाडे आकारणी दरपत्रकाची जागृती करणारे फलक लावा.
तक्रार आल्यास शहानिशा करून प्रवाश्यांना २४ तासात न्याय द्यावा.
पथक तयार करून भाडे आकारणीतील अनियमितता तपासावी.
अवास्तव भाडे आकारणाऱ्या बस ट्रॅव्हल्स चालकांवर दंडात्मक कार्यवाही करावी.