जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑक्टोबर २०२२ । आसमंत उजळून टाकणाऱ्या दिव्यांच्या विविध प्रकारांनी जळगावातील बाजारपेठा सजल्या आहेत. ग्राहकांच्या पसंतीसाठी पारंपरिक दिव्यांबरोबरच आधुनिक ‘ट्रेंडिंग पणत्या’ बाजारपेठेत दाखल झाले आहेत. स्वस्तिक, पाने, फुले, चांदण्या अशा वैविध्यपूर्ण आकारातील पणत्यां बाजारात आहेत. याच बरोबर विविध नक्षीकाम केलेल्या नक्षीदार पणत्या महिलांसाठी बाजारात उपलब्ध आहेत.
दिवाळीमध्ये सर्वाधिक महत्त्व दिले जाते ते पणत्यांना. वसुबारसपासूनच दीपोत्सवाला सुरुवात होते, आणि बघता बघता या पणत्यांमुळे घराचे अंगण प्रकाशाने उजळून जाते. मंगलमय वातावरणात रंग भरणाऱ्या दिव्यांमध्ये दर वर्षी नवनवीन प्रकार बघायला मिळतात.
आधीच्या काली एकाच साच्यातून तयार होणाऱ्या पारंपरिक पणत्या बाजारपेठेत पाहायला मिळत असायच्या मात्र आता हळूहळू जसा काळ बदलतो आहे तस तश्या पणत्याही बदलत आहेत. या वर्षी स्वस्तिक, फुले, पाने, चांदण्या, नक्षीकाम केलेल्या रंगीत आणि साध्या मातीच्या पणत्या उपलब्ध आहेत. पाच रुपये ते दीडशे रुपयांना एक अशी या पणत्यांची किंमत आहे.
क्रिएटिव्ह पणत्यांमध्ये आरसे, कुंदन, मोती, चमकी आणि खड्यांचा वापर केला असून, खास लक्ष्मीपूजनासाठी या पणत्यांची खरेदी करीत आहेत. यातही हंडी, लामण दिवा, नारळ, ताम्हन असे विविध आकार उपलब्ध आहेत. या पणत्या पंचवीस रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंत विविध किमतीत उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे साध्या पणत्यांचीही खरेदीत घट झालेली नाही. कुंभारवाड्यातील कारागिरांनी या वर्षी पणत्यांचे लॅम्प तयार केले आहेत, त्यांनाही चांगली मागणी आहे.