संतप्त कोळी समाज बांधवांनी ग्रामपंचायतीला ठोकले कुलूप
Dhanora News-जळगाव लाईव्ह न्यूज । अमोल महाजन । चोपडा तालुक्यातील धानोरा येथील ग्रामपंचायत प्रशासनाला रामायणकार, आद्यकवी, गुरुदेव, महर्षी वाल्मिकी ऋषी यांची जयंती साजरी करण्याचा विसरच पडला असल्याने समस्त कोळी समाज बांधवांनी याबाबत आज सोमवारी ग्रामपंचायत प्रशासनास जाब विचारला असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. यामुळे संतप्त झालेल्या कोळी समाज बांधवांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलुप ठोकून निषेध व्यक्त केला.
काही वेळाने कोळी समाज बांधव व ग्रामपंचायत प्रशासनातर्फे ग्रामसेवक विकास इंधे, गोकुळ कोळी यांनी आपसात सामंजस्याने ग्रामपंचायत प्रशासन जाहीर माफी मागणार असल्याचे सांगितले, तद्नंतर लावलेले कुलूप उघडण्यात आले. तालुक्यातील धानोरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात वर्षभरात विविध राष्ट्रपुरुष/थोर व्यक्ती,संत महात्मा यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे केले जातात परंतु रविवारी (ता.९) आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषी यांची जयंती असल्याने ग्रामपंचायत प्रशासनास चक्क महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्याचा विसरच पडला असल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते आहे.
तब्बेत खराब होती पूजन केलेलं असेल
सोमवारी (ता.१०) आद्यकवी महर्षी वाल्मिक ऋषी यांची जयंती ग्रामपंचायत कार्यालयात का साजरी करण्यात आली नाही याबाबत जाब विचारण्यासाठी कोळी समाज बांधव
ग्रामपंचायत कार्यालयात आले असता ग्रामसेवक विकास इंधे यांनी माझी तब्बेत खराब होती त्यांनी पूजन केलेले असेल असे उत्तर दिल्याने कोळी समाज बांधवानी संतप्त होत ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले.
पदाधिकाऱ्यांवर रोष
धानोरा ग्रामपंचायत कार्यालयात आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती निमित्ताने प्रतिमा पूजन करणे त्यांचे आद्य कर्तव्य असताना सुद्धा या दिवशी कार्यालयात एकही पदाधिकारी फिरकलाच नाही. यामुळे गावातील कोळी समाज बांधवांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर रोष व्यक्त करत त्यांनी जाहीर माफी मागावी अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
निषेध व्यक्त करत दिले निवेदन
शासनाच्या आदेशानुसार आद्यकवी महर्षी वाल्मिकी ऋषी यांची जयंती ग्रामपंचायत कार्यालयात साजरी करणे बंधनकारक असताना सुद्धा ग्रामसेवक, सरपंच, सदस्य यांनी हेतुपुरस्कर जयंती साजरी केली नसल्याने शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी यासाठी ग्रामस्थ व कोळी समाज बांधवांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देत निषेध व्यक्त केला यावेळी अर्जुन साळुंके, अनिल सोनवणे, नितीन कोळी,देवेंद्र साळुंके,जयेश साळुंके,दीपक साळुंके,शुभम कोळी,किरण कोळी,रविंद्र कोळी,प्रल्हाद कोळी,शांताराम कोळी आदी उपस्थित होते.