निवडणूक आयोगाने धनुष्यबाण गोठवल्याच्या निर्णयावर शरद पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले..
जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑक्टोबर २०२२ । शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने काल संध्याकाळी अंतरिम निकाल देत धनुष्य-बाण’ चिन्ह गोठवले आहे. यानंतर आता उद्धव ठाकरे गट किंवा एकनाथ शिंदे गटालाही त्याचा वापर करता येणार नाही. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्याची भीती होती तोच निर्णय दिला गेल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसेच योग्य निर्णय दिले जातील याची आता खात्रीही नाही, असा टोला देखील पवारांनी यावेळी लगावला आहे.
निवडणूक चिन्ह राहो की न राहो, येत्या निवडणुकीची तयारी करायला हवी, असेही पवार म्हणाले. मी नाव सुचवू शकत नाही पण शिवसेना बाळासाहेब ठाकरे असू शकते. काँग्रेसमध्ये दोन गट पडले होते, त्यावेळी काँग्रेस इंदिरा आणि काँग्रेस राष्ट्रवादी असा निर्णय घेण्यात आला होता. तसेच ठाकरेंची शिवसेना संपणार नाही, तर पक्ष अधिक जोमाने वाढेल असं पवार यांनी म्हटलं आहे. तसेच महाविकास आघाडी कायम राहणार असल्याचंही शरद पवार यांनी सांगितलं.
शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक आयोगाच्या निर्णयावरून महाराष्ट्रात आता राजकीय हालचालीला वेग आला आहे. यासोबतच माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाने हे चिन्ह कायम ठेवण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याबाबत विचारविनिमय सुरू केला आहे. निवडणूक आयोगाने सध्या शिवसेनेच्या दोन्ही गटांना पक्षाचे नाव आणि ‘बाण-कमांड’ हे निवडणूक चिन्ह वापरण्यास बंदी घातली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे म्हणाले की, निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह पुढे ढकलले असेल, पण महाराष्ट्रातील जनता उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. हे सर्व कोणाच्या इशाऱ्यावर होत आहे, हे महाराष्ट्रातील जनतेलाही माहीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पूर्णपणे उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहे. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा (एमव्हीए) उमेदवार विजयी होणार आहे.