महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष लढाई, पहा सर्वोच्च न्यायालयातून लाईव्ह प्रक्षेपण..
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ सप्टेंबर २०२२ । एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत (Shiv Sena) दोन गट पडले आहेत. दोन्ही गट पक्ष आणि निवडणूक चिन्हावर दावा करत आहेत. राज्यात उद्भवलेल्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. दरम्यान, या सुनावणीचे थेट प्रक्षेपण होणार असून जनतेला आता घरबसल्या ही सुनावणी थेट पाहता येणार आहे.
एकनाथ शिंदे यांचे बंड आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल झाल्या होत्या. त्यात शिंदे गटातील १६ आमदारांची अपात्रता, राज्यपालांकडून एकनाथ शिंदे यांना सरकार स्थापनेचे निमंत्रण, नवीन सभापती निवडीची प्रक्रिया आणि पक्षाचे अधिकार आदींचा समावेश आहे. निवडणूक आयोगाच्या या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी उद्धव ठाकरे गटाकडून होत आहे. दुसरीकडे कारवाई थांबवण्याच्या मागणीला शिंदे गटाकडून विरोध होत आहे.
दरम्यान, महाराष्ट्राच्या या सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर आज 27 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या सुनावण्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग आजपासून होणार आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठासमोर आज महत्त्वाची सुनावणी आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीत खरी शिवसेना कोणाची, याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुनावणी प्रलंबित असून ती सुरू करायची की नाही, याबाबतचा निर्णय आज अपेक्षित आहे.