जळगाव लाईव्ह न्यूज । १७ सप्टेंबर २०२२ । बोदवड येथील तहसील कार्यालयात विना परवानगी व्हिडिओ शुटींग केल्यानंतर त्याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या कर्मचार्यास धक्काबुक्की करून शासकीय कार्यालयातील कागदपत्रांची फेकाफेक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोघांविरोधात बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवार, 16 रोजी 12.35 वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयात नायब तहसीलदार संध्या सूर्यवंशी आपल्या दालनात असतांना संशयीत आरोपी प्रीतम अवचित पालवे हे आसीफ शेख याच्यासोबत आले. पालवे यांनी गोंधळ घालत त्यांना नोंदीबाबत विचारणा केली. याप्रसंगी आसीफ शेख यांना त्यांनी मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्यास सांगितले. यानंतर या दोघांनी संध्या सूर्यवंशी यांच्यासोबत हुज्जत घातली.
हा गोंधळ सुरू असतांना सचिन पाटील या कर्मचार्याने धाव घेत या दोघांना आवरण्याचा प्रयत्न केला. यावर या दोघांनी त्यांना मारहाण करून शिवीगाळ केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तहसील कार्यालयात धाव घेतल्यानंतर हा गोंधळ मिटला. या संदर्भात संध्या सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बोदवड पोलीस स्थानकात प्रितम अवचित पालवे आणि आसीफ शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रीतम पालवे यास अटक करण्यात आली. तपास सहाय्यक निरीक्षक अंकुश जाधव करीत आहेत.