Yawal News-जळगाव लाईव्ह न्यूज । १५ सप्टेंबर २०२२ । यावल तालुक्यातील साकळी येथील ग्रामपंचायतच्या सर्व कर्मचाऱ्यांचे गेल्या एका वर्षापासून पगार थकले असून पगाराअभावी आपल्या संसाराचा गाडा कसा ओढायचा ? असा गंभीर प्रश्न या कर्मचाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. तरी संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाने सर्व कर्मचाऱ्यांचे थकित पगार अदा कराण्याची मागणी सर्व कर्मचाऱ्यांनी पंचायत समिती (यावल), ग्रामपंचायत (साकळी), तसेच ग्रामपंचायत कर्मचारी संघटना (जळगाव) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. तसेच मागणी पूर्ण न झाल्यास कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. अखेर मागणी पूर्ण न झाल्याने कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरु केले आहे.
येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोरच जवळपास दोन ते तीन तास बसून राहिले. या आंदोलनात ग्रामपंचायतीचे आस्थापना, आरोग्य व पाणीपुरवठा विभागाचे सर्व कर्मचारी सहभागी झालेले होते. गेल्या बारा महिन्यांपासून पगार होत नसल्याने सर्वच कर्मचारी मोठ्या आर्थिक अडचणीमुळे आपल्या कौटुंबिक समस्येच्या भावना व्यक्त करीत संताप व्यक्त करीत होते. या आंदोलनादरम्यान वातावरण अतिशय संवेदनशील व भावनात्मक बनले होते. या आंदोलनादरम्यान माजी जि.प. वसंतराव महाजन, नुतन विकासाचे संचालक सुभाष महाजन, ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विजय रल, ग्रामपंचायत सदस्य सय्यद अशपाक सय्यद शौकत, दिनकर माळी, खतिब तडवी, जगदीश मराठे, माजी ग्रामपंचायत सदस्य शे. बिस्मिल्ला शे.रहेमान (बाबा मेंबर), किशोर आप्पा चौधरी, जिवन बडगुजर, किसन महाजन, सचिन चौधरी, शेख अन्वरभाई, नितीन फन्नाटे यांचे सह अनेक पदाधिकारी व नागरिकांनी भेट दिली व कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला व कोणत्याही परिस्थितीत कर्मचाऱ्यांचे सर्व पगार झाले पाहिजे. अशी अपेक्षा व्यक्त केली.
साकळी ग्रामविकास अधिकारी हेमंत जोशी यांनी आंदोलनाच्या ठिकाणी भेट देऊन आंदोलक कर्मचाऱ्यांची बाजू ऐकून घेतली व त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. ग्रामपंचायत प्रशासनाच्या स्तरावरून गावात फिरून करवसुली करून जमलेल्या पैशातून आपल्या काहीतरी पगाराची व्यवस्था होऊ शकते. त्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाला सहकार्य करा असे आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सांगितले. त्यावर आम्हाला लेखी द्या ! त्यानंतर आम्ही आंदोलन मागे घेतो असे आंदोलकांनी भूमिका घेतली. ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रल यांनी सुद्धा आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांची बाजू घेत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघे बाजूने आपआपल्या भूमिकेवर ठाम असल्यानने आंदोलनाचा तिढा कायम राहिला आहे. कुठलाही मार्ग निघाला नाही. या काम बंद आंदोलनामुळे यापुढील काळात गावातील नागरी समस्या सोडवण्यासाठी मात्र मोठी अडचण निर्माण होणार आहे.