जळगाव लाईव्ह न्यूज । ६ सप्टेंबर २०२२ । जळगाव जिल्ह्यातील पोलिसांसाठी पोलीस मुख्यालयामागे नव्याने वसाहत उभारण्यात आली आहे. मंगळवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास एका खोलीतून धूर आणि आग दिसू लागली. कुटुंबीय बाहेर गेले असताना हा प्रकार घडला असून आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज आहे.
पोलीस मुख्यालयामागे नव्याने पोलीस वसाहत उभारण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयातील ईश्वर पंडित पाटील हे कर्मचारी कुटुंबासह अ-३ इमारतीमध्ये खोली क्रमांक ७०२ मध्ये राहतात. मंगळवारी सायंकाळी ईश्वर पाटील यांचे कुटुंबीय घराला कुलूप लावून बाहेर गेलेले होते. रात्री ८.३० ते ९ वाजेच्या सुमारास अचानक खोलीतून धूर बाहेर येऊ लागला तर खाली खिडकीतून शॉर्टसर्किट होत असल्याचे दिसत होते.
आजूबाजूच्या रहिवाशांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी पाटील कुटुंबियांना कळविला. तसेच इमारतीमध्ये असलेल्या फायर एक्सट्रूनजरच्या साहाय्याने आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. ईश्वर पाटील घरी आल्यावर काही वेळाने आग आटोक्यात आली. आगीत इलेक्ट्रॉनिक वायर, लायटिंग, टीव्ही आणि इतर साहित्याचे नुकसान झाले आहे.
ईश्वर पाटील यांचे कुटुंबीय घरी आल्यावर घराची परिस्थिती पाहून त्यांना अश्रू अनावर झाले होते. आगीत धुराने घर काळेकुट्ट झाले असून इमारतीमध्ये योग्य व्यवस्था असल्याने आगीवर लवकर ताबा मिळवणे शक्य झाले आहे.