‘चून चून के मारे जायेंगे’ ; शिंदे गटातील आमदाराची थेट धमकी, काय आहे नेमकं प्रकरण?
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ सप्टेंबर २०२२ । बुलढाण्यामध्ये काल (शनिवारी) शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम चालु असताना शिवसेनेच्या आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेला पाहायला मिळाला होता. यावेळी खुर्च्यांची तोडफोड करत कार्यक्रम उधळून लावला. मात्र, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना धमकावलंय.
एकनाथ शिंदे यांच्याविरोधात पातळी सोडून बोलाल, तर चून चून के, गिन गन के मारे मायेंगे, असं म्हणत त्यांनी ठणकावलंय. बुलढाण्यामध्ये शनिवारी ठाकरे गटाचे नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या वेळी आमच्या नेत्यांवर टीका का करता?, असं म्हणत शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या मुलाने आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी राडा केला. कुणाल गायकवाड आणि त्यांचे कार्यकर्ते शिवसेनेच्या कार्यक्रमाच्या स्थळी दाखल झाले. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपली होती.
बुलढाण्यामध्ये झालेल्या राड्याआधी पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी खुर्च्यांची तोडफोड करत कार्यक्रम उधळून लावण्यात आला. विशेष म्हणजे पोलिसांच्या समोरच हा सगळा राडा झाला होता. या संपूर्ण राड्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त विधान केलंय. त्यामुळे बुलढाण्यातील राजकारण आता पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.