जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२१ । महाराष्ट्रात तंबाखूजन्य पदार्थ व गुटखा बंदी असतांना भुसावळकडून मुक्ताईनगरकडे जाणाऱ्या बोलेरो वाहनातून सुगंधित तंबाखू आणि गुटख्याची वाहतूक होत असल्याचा प्रकार पोलिसांना निदर्शनास आला. याप्रकरणी महामार्गावर पोलिसांनी कारवाई करत १५ लाखांचा गुटखा आणि पाच लाख रुपयांचे वाहन असा २० लाखांचा मुद्देमाल वरणगाव पोलिसांनी जप्त केला, तसेच दोन संशियितांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
याबाबत असे की, हवालदार योगेश पाटील वरणगाव बसस्थानक चौकात नाकाबंदी करत होते. भुसावळकडून मुक्ताईनगरकडे जाणाऱ्या चारचाकी मालवाहतुक (गाडी क्र. एम.एच 20 सी.6964) मधून बेकायदा विमल गुटखा वाहतूक होत असल्याचा संशय आला. त्यांनी वाहनाचा पाठलाग केला. यावेळी पोलिसांनी वाहनचालक संशयित रियाज अली लियाकत अली (वय २७) व सिकंदरकुमार सानी (वय २५, रा.दोघे नशिराबाद) यांना ताब्यात घेतले.
वाहनात विमल गुटख्याच्या १८ गोण्या व सुंगधित तंबाखूच्या १५ गोण्या आढळल्या. हा गुटखा नशिराबाद येथून आणला असून, माल देणाऱ्याचे नाव गणेश चव्हाण (रा. नशिराबाद) असल्याचे संशयितांनी सांगितले. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. अटकेतील दोघे संशयित व जप्त मुद्देमालासह वरणगाव पोलिसांचे पथक. या कारवाईमुळे गुटखा पुरविणाऱ्या व्यापाऱ्याची चांगलीच धादल उडाली आहे.