माहितीचा खजाना अर्थात ‘गॅझेटीअर (दर्शनिका)’ : जाणून घ्या ‘गॅझेटीअर’चा रंजक इतिहास
जळगाव लाईव्ह न्यूज । जिल्हा माहिती कार्यालय । कोणत्याही समाजाच्या किंवा देशाच्या प्रगतीत तो देश, समाज इतिहासाच्या कोणत्या वळणावरून पुढे आला, हे नव्या पिढ्यांना ठाऊक असणे आवश्यक असते, त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला नेमके काय आहे याचे सामाजिक, भौगोलिक, शास्त्रीय आणि इतिहासाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. ‘गॅझेटीअर’ (दर्शनिका) हेच कुतूहल शमविण्याचे महत्त्वाचे कार्य करते. त्या- त्या प्रदेशातील सामाजिक, आर्थिक व भौगोलिक सर्वेक्षण करून त्या आधारे वस्तुस्थितीची मांडणी करून भविष्यात उपयुक्त ठरणारे असे हे संदर्भसाधन निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य ‘गॅझेटीअर’ मध्ये झालेले असते. माहितीचा खजाना अर्थात ‘गॅझेटीअर’ हा शब्द रूढ झाला आहे. अशा या ‘गॅझेटीअर’ (Gazetteer) चा सर्वसामान्य लोकांना कसा फायदा होतो. त्यांच्या रंजक इतिहासाविषयी सविस्तर माहिती या लेखात आपण जाणून घेणार आहोत…!
‘गॅझेट्टा’ हे १५६६ मध्ये व्हेनिसमध्ये शासकीय वृत्तपत्राचे नाव होते. विशेष म्हणजे ते ‘गॅझेट्टा’ या नाण्यापासूनच खरेदी करता येत होते. ‘वृत्तपत्र’ या अर्थी ‘गॅझेट’ हा शब्द अद्यापही वापरला जातो. ‘गॅझेट’ लिहिणारा तो ‘गॅझेटीअर’ असा प्रथम अर्थ होता. भौगोलिक माहितीचा कोश या अर्थी ‘गॅझेटीअर’ हा शब्द सुरुवातीस दिलेल्या अर्थाने एकोणिसाव्या शतकात इंग्रजीत रूढ झाला. पाश्चात्त्य देशांत सहाव्या शतकात ‘सायलॅक्स’ व त्यानंतर २०० वर्षांनी ‘मीगॅस्थीनीझ’ यांनी भारताचा वृत्तांत लिहिला होता. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात मौर्यकालीन भारताची भौगोलिक माहिती आकडेवारीसह आहे. फाहियान, ह्युएनत्संग, इब्न बतूता यांनीही आपापले वृत्तांत लिहून ठेवले आहेत. अल्-बीरूनीच्या ‘इंडिका’त सूक्ष्म निरीक्षण व शास्त्रीय विश्लेषण दिसते. सहाव्या शतकाच्या प्रारंभी बायझंटियममधील स्टेफीनने तयार केलेले गॅझेटीअर व १०८५-८६ मध्ये विल्यम द काँकररने करविलेल्या इंग्लंडच्या पाहणीवरून तयार झालेले ‘डोम्स डे बुक’ (Domes Day Book) ही हल्लीच्या ‘गॅझेटीअर’ची पूर्वस्वरूपे म्हणता येतील.
जिनीव्हात १५६५ मध्ये चार्ल्स स्टीफनने प्रसिद्ध केले पाहिले ‘गॅझेटीअर’
आधुनिक कल्पनेप्रमाणे प्रथम तयार झालेले ‘गॅझेटीअर’ म्हणजे जिनीव्हात १५६५ मध्ये चार्ल्स स्टीफनने प्रसिद्ध केलेला ऐतिहासिक भौगोलिक कोश होय. यानंतर अनेक ‘गॅझेटीअर’ रूपी पुस्तके झाली. या सर्वांत तत्कालीन विशिष्ट शास्त्रीय कल्पना, लोकभ्रम व इतर सामान्य चुका असत. १८१७ मध्ये जर्मन भूगोल अभ्यासक योहान्न जी. एच्. हॅसेल यांनी लिहलेले गॅझेटीयर इतरांना प्रमाणभूत ठरला. हल्ली बहुतेक नकाशासंग्रहांच्या शेवटी ‘गॅझेटीअर’ असते. त्यात त्या संग्रहातील नकाशांत दाखविलेल्या भौगोलिक गोष्टींची वर्णानुक्रमाने यादी व ती कोणत्या नकाशात कोठे सापडतील ते दिलेले असते. काही संग्रहांत स्थळांचे अक्षांश, रेखांश, लोकसंख्या इ. माहिती ही त्याबरोबर असते.
जेम्स एम्. कँबेलने तयार केले महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचे ‘गॅझेटीअर’
भारत परकीय सत्तेच्या अधिपत्त्याखाली असणाऱ्या काळात मुंबई इलाख्याच्या प्रत्येक जिल्ह्याचे ‘गॅझेटीअर’ सरकारी आदेशानुसार जेम्स एम्. कँबेल याने तयार केले होते. त्यात त्या-त्या जिल्ह्याचे भौगोलिक वर्णन, उत्पन्ने, लोकसंख्या, शेतकी, भांडवल, व्यापार, इतिहास, जमिनीचा महसूल, न्याय, सार्वजनिक पैशाची व्यवस्था इ. अनेक बाबींचा तपशील दिलेला आढळतो. याच पद्धतीवर इतर इलाख्यांत आणि काही संस्थानांतही ‘गॅझेटीअर’ तयार झाली. १९४७ नंतर भारतासोबत आशियाई राष्ट्रे स्वतंत्र झाली. आफ्रिकेला जागतिक प्रश्नांत महत्त्वाचे स्थान मिळाले. वसाहतवाद नामशेष झाला. विज्ञान व तंत्र यांमुळे जुन्या आर्थिक व सामाजिक संस्थांत बदल झाला. भारताचे स्वातंत्र्य, महायुद्धानंतर झालेली औद्योगिक प्रगती, शिक्षणाचा प्रसार, लोकांच्या नैतिक व मानसिक प्रवृत्तींत बदल, यांमुळे सामाजिक आणि राजकीय जीवन बदलले आहे. प्राकृतिक रचना, हवामान इत्यादींचेही नवीन उपलब्ध ज्ञानानुसार पुनर्लेखन अवश्य झाले आहे.
हे देखील वाचा : एका शेअरमुळे जळगाव जिल्ह्यातील एक गाव झाले ७००० कोटींचे मालक ; जाणून रोचक इतिहास
१९५१ मध्ये मौलाना आझादांनी संसदेत मांडली ‘केंद्रीय गॅझेटीअर पुनर्रचनेची’ योजना
एप्रिल १९५१ मध्ये ‘केंद्रीय गॅझेटीअर पुनर्रचनेची’ योजना (gazetteer of india) मौलाना आझाद यांनी संसदेत मांडली. केंद्र शासनाने भारतीय स्वरूपाचे खंड आणि राज्य शासनांनी जिल्हावार नवीन ‘गॅझेटीअर’ तयार करावी असे ठरले. ‘गॅझेटीअर’ पुनर्रचनेस मुंबई राज्याने १९४९ मध्ये सुरुवात करून चांगले काम केले. १९५४ मध्ये पुणे खंड प्रसिद्ध झाला. इतर राज्यांनीही मग सुरुवात केली. वर्णानुक्रमाने खंड न करता जिल्हा गॅझेटीअरांची अखिल भारतीय सूची करावी असे ठरले. जिल्हा ‘गॅझेटीअर’ झाल्यावर राज्य ‘गॅझेटीअर’ करावयाची आहेत. या सर्वांचे स्वरूप एका विशिष्ट योजनेप्रमाणे व विशिष्ट दर्जाचे राहील. जानेवारी १९५८ मध्ये सेंट्रल गॅझेटीअर युनिट व फेब्रुवारीत त्यासाठी सेंट्रल ॲडव्हायझरी बोर्ड स्थापन झाले. ऑगस्ट १९५९ मध्ये प्रा. हुमायून कबीर यांची त्यांच्या अध्यक्षपदी योजना झाली. एकूण ३०० जिल्हा‘गॅझेटीअर’ व्हावयाची आहेत.
महाराष्ट्र शासनाने १९६४ ला स्थापन केले स्वतंत्र गॅझेटिअर डिपार्टमेंट
महाराष्ट्र शासनाने ३१ ऑक्टोबर १९६४ रोजी दर्शनिका विभाग (गॅझेटिअर डिपार्टमेंट ) हा एक स्वतंत्र विभाग म्हणून स्थापन केला आहे. या विभागाकडून इंग्रजी व मराठी भाषांमधून खालील सहा मालिकांमध्ये गॅझेटिअर ग्रंथ प्रकाशित केले जातात. ब्रिटिशकालीन जिल्हा गॅझेटिअर (इंग्रजी ) ग्रंथांचे पुनर्मुद्रण ब्रिटिशकालीन जिल्हा गॅझेटिअर ग्रंथाच्या सुधारित आवृत्तीचा संदर्भग्रंथ म्हणून अभ्यासक उपयोग करतात. यामध्ये २६ ग्रंथाचे पुनर्मुद्रण करून ते प्रकाशित करण्यात आलेले आहेत. जिल्हा गॅझेटिअर ग्रंथ (इंग्रजी-सुधारित आवृत्ती) या मालिकेत राज्यातील पूर्वीच्या २६ जिल्ह्यांपैकी २५ जिल्ह्यासाठी प्रत्येकी एक व बृहन्मुंबईसाठी ३ असे एकूण २८ ग्रंथ इंग्रजी भाषेतून प्रकाशित करण्यात आलेले आहेत.
हे देखील वाचा : जाणून घ्या… जी.एस.ग्राउंडचे संपूर्ण नाव आणि इतिहास
आजपर्यंत प्रकाशित झाले १७ मराठी ‘जिल्हा गॅझेटिअर ग्रंथ’
जिल्हा गॅझेटिअर ग्रंथ (मराठी) राज्यातील सर्व जिल्ह्यासाठी ‘जिल्हा गॅझेटिअर ग्रंथ’ मराठीतून प्रकाशित करण्याची ही मालिका आहे. साधारण १००० ते १२०० पृष्ठांच्या या ग्रंथात नव्या दृष्टिकोनातून सामाजिक व आर्थिक क्षेत्रातील स्थित्यंतरे व दूरगामी बदल यांच्या माहितीबरोबर जिल्ह्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी, स्वतंत्र आंदोलन, भूगोल, लोक, अर्थव्यवस्था, प्रशासन, नियोजन, व्यापार, सामाजिक सेवा, संस्कृती व प्रेक्षणीय स्थेळे या विषयांवर सखोल माहिती देण्यात येते. आतापर्यंत या योजनेंतर्गत परभणी, वर्धा, कोल्हापूर, रायगड, जळगाव, सातारा नागपूर (भाग १ व २ ), लातूर (भाग १ व २), नांदेड (भाग १ व २) व बुलडाणा (भाग १ व २) ‘जिल्हा गॅझेटिअर ग्रंथ’ प्रकाशित करण्यात आले आहेत. तर चंद्रपूर व सिंधुदुर्ग जिल्हा गॅझेटिअर काम सुरु आहे. महाराष्ट्र राज्य गॅझेटिअर (मराठी व इंग्रजी) ज्या विषयावर जिल्हा पातळीपेक्षा राज्य पातळीवर उत्तमरीत्या लेखन होऊ शकते अशा विषयांवर राज्य गॅझेटीअर ग्रंथ इंग्रजी व मराठीतून प्रकाशित करण्याची ही मालिका आहे. या मालिकेंतर्गत १७ राज्य गॅझेटिअर प्रकाशित करण्यात आले आहेत.
लेख सौजन्य : जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव.