जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑगस्ट २०२२ । रेशनचे स्वस्त धान्य काळ्यात बाजारात विक्रीसाठी जात असलेला ट्रक भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी शहरातील हिरा हॉलजवळून सोमवार, 22 रोजी रात्री 11 वाजता ताब्यात घेतला होता. जप्त ट्रकमधील तांदुळ हा रेशनचा आहे वा नाही याबाबत पुरवठा विभागाला पत्र दिल्यानंतर पुरवठा विभागाने जप्त तांदूळ रेशनचा आहे वा नाही याबाबत सांगता येत नाही, अशी मोघम भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते तर बाजारपेठ पोलिसांनी मात्र या प्रकरणी आता चौघांविरोधात गुन्हा दाखल करून 15 लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याने भुसावळातील रेशन माफियांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सोमवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास शहरातील हॉटेल हिरा हॉलजवळून ट्रक (एम.एच.19 सी.वाय.1514) ताब्यात घेतला होता. त्यात रेशनचे सुमारे दहा टन धान्य व बाजारमूल्य एक लाख असून 14 लाखांचा ट्रकही जप्त करण्यात आला होता. जप्त केलेल्या तांदुळाबाबत बाजारपेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी तुषार केशव पाटील (35) यांच्या फिर्यादीनुसार ट्रक चालक पुरूषोत्तम समाधान बोंडे (32, मन्यारखेडा, पोस्ट वरणगाव, ता.भुसावळ), विलास अशोक कोळी, इम्रान शेख, रीजवान शेख व उमर शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह जिल्हा परीषद सदस्य पल्लवी प्रमोद सावकारे यांनी भुसावळातील रेशनच्या काळ्याबाजाराबाबत आवाज उठवला होता. मात्र, त्यानंतरही रेशन माफियांच्या कारवाया थांबलेल्या नाहीत. भुसावळ शहर व परीसरात स्वस्त धान्याची काळ्या बाजारात विक्री करणारे रॅकेट मोठ्या प्रमाणावर सक्रिय असून स्थानिक तहसील प्रशासन व पुरवठा विभागाची भूमिका कारवाईबाबत तोंडावर बोट ठेवून असल्याने रेशन माफियांचे भावले आहे. माजी मंत्री व आमदार एकनाथराव खडसे यांनी अधिवेशनात रेशनचा होणार्या काळ्या बाजाराबाबत आवाज उठवावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे तर जळगाव जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांनी या प्रकरणी लक्ष घालावे, अशी अपेक्षा सुज्ञ भुसावळवासी व्यक्त करीत आहेत.