जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑगस्ट २०२२ । जिल्ह्यातील खुनाचे सत्र अद्यापही थांबलेले नाही. दोन दिवसापूर्वी यावल तालुक्यातील चितोडा येथे झालेले खून प्रकरण ताजे असतानाच आज पुन्हा एक खून झाल्याचे समोर आले आहे. वाळूमाफियांच्या वादातून एसएमआयटी महाविद्यालयाजवळ हा खून झाल्याचे समजते. भावेश उत्तम पाटील असे मयताचे नाव आहे.
जळगाव जिल्ह्यात दर आठवड्याला खून होत असून किरकोळ वादातून खून होत असल्याचे समोर येत आहे. दोन दिवसापूर्वी यावल तालुक्यातील चितोडा गावी एका तरुणाचा मध्यरात्री खून करण्यात आला होता. उधारीच्या पैशातून हा खून झाल्याचे समोर आले होते. यावलनंतर जळगावात देखील खून झाला असून मध्यरात्री भरवस्तीत भर रस्त्यावर हा खून झाला आहे.
भावेश उत्तम पाटील वय-३० रा.आव्हाणे, हल्ली मुक्काम निवृत्तीनगर असे मयताचे नाव आहे. रात्री ११ ते १२ वाजेच्या सुमारास एसएमआयटी महाविद्यालयासमोरील १०० फुटी रस्त्यावर हा खून करण्यात आला. चाकूने सपासप वार केल्याने तरुण रस्त्यावरच रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. खून करणारे संशयीत वाळूमाफिया असून वाळू व्यवसायाच्या वादातून खून झाल्याची प्राथमिक माहिती आहे. खून केल्यानंतर संशयीत पसार झाले असून मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करणे सुरू असून संशयितांचा शोध घेतला जात आहे.