जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२१ । महाराष्ट्रात कोरोना संसर्गाची लाट आली आहे. कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी राज्यात ब्रेक द चेन अंतर्गत १ मे पर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहेत. यात अत्यावश्यक कारणांशिवाय आंतरजिल्हा प्रवासाला मनाई करण्यात आली आहे. आंतरजिल्हा प्रवास करायचा असेल तर त्यासाठी ई-पास काढणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
नागरिकांना काही महत्त्वाच्या आणि खासगी कारणांसाठी प्रवास करण्याची गरज निर्माण झाल्यास त्यांना ई- पास काढावा लागणार आहे. त्यासाठी रितसर अर्ज करण्याची आवश्यकता असणार आहे. तर जाणून घ्या ई- पास कसा मिळवायचा…
कसा मिळवायचा ई- पास?
– ई- पास मिळवण्यासाठी https://covid19.mhpolice.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.
– त्यानंतर ‘apply for pass here’ पर्याय निवडा.
– पुढे तुम्हाला ज्या जिल्ह्यात प्रवास करायचा आहे, तो जिल्हा निवडा.
– आवश्यक कागदपत्र इथं जोडा.
– प्रवास करण्यासाठीचं अत्यावश्यक कारणही नमूद करावं.
– कागदपत्र अपलोड करताना सर्व माहिती तपशील एकाच डॉक्युमेंटमध्ये घेऊन ती फाईल अपलोड करावी.
– अर्ज केल्यानंतर तुम्हाला एक टोकन आयडी देण्यात येईल. तो सेव्ह करुन अर्ज नेमका कोणत्या प्रक्रियेत आहे हे तुम्ही जाणू शकता. म्हणजेच तुम्हाला अर्जाचं स्टेटस तपासता येईल.
– पडताळणी आणि आवश्यक विभागांची परवानगी मिळाल्यानंतर तोच टोकन आयडी वापरुन तुम्ही ई- पास डाऊनलोड करु शकता.
– या ई-पासमध्ये तुमची माहिती, वाहनाचा क्रमांक, पासचा वैधता कालावधी आणि क्यूआर कोड असेल.
– प्रवास करतेवेळी पासची मूळ प्रत आणि त्याची सॉफ्ट कॉपीही सोबत बाळगा. जेणेकरुन पोलिसांनी विचारलं असता, त्यांना हा पास दाखवता येऊ शकतो.
ई- पासबद्दलचे काही महत्त्वाचे मुद्दे-
– अतिशय जवळच्या व्यक्तीचा विवाहसोहळा, एखाद्या व्यक्तीचा अंत्यविधी आणि अत्यावश्यक आरोग्य आणीबाणी या कारणांसाठी ई-पास मिळवता येऊ शकतो.
– अत्यावश्यक सेवांतील कर्मचाऱ्यांना आंतरराज्यीय आणि जिल्हांतर्गत प्रवासासाठी ई- पासची गरज नाही.
– कोणतीही व्यक्ती किंवा त्यांचा समूह या पाससाठी अर्ज करु शकतो.
– ज्यांना ऑनलाईन सेवेसाठीचा अॅक्सेस मिळत नाही, अशा व्यक्तींनी ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नजीकच्या पोलीस स्थानकाला भेट द्यावी.