जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑगस्ट २०२२ । जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. भुसावळ शहरातील गोकुळ नगरात घर फोडून सोन्याचे दागिने आणि चांदीचे शिक्के असा एकूण २० हजार २०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनेश भोजलाल लोहार यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली. भुसावळ शहरातील गोकुळ नगरात दिनेश लोहार यांची बहीण वास्तव्याला आहे. परंतु, काही कामानिमित्त त्यांची बहीण घराला कुलूप लावून बाहेरगावी गेल्या होत्या. दरम्यान, चोरटयांनी बंद घर असल्याची संधी हेरत डाव साधला. यात सोन्याचे दागिने, चांदीचे पैंजण आणि चांदीचे शिक्के असे एकूण २० हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार मंगळवार २ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता उघडकीला आला.
या संदर्भात दिनेश लोहार यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून सायंकाळी ८ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात आज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय नेरकर करीत आहे.